मुंबईतील पहिल्या ‘एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे’ची प्रतीक्षाच; अद्यापही प्रकल्पपूर्ती टप्प्यात नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:15 IST2025-01-02T14:15:26+5:302025-01-02T14:15:47+5:30

मलबार हिलच्या गर्द झाडीतून हा वॉकवे तयार करण्यात आला आहे.

Mumbai's first 'elevated forest walkway' still awaited; project not yet in completion stage | मुंबईतील पहिल्या ‘एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे’ची प्रतीक्षाच; अद्यापही प्रकल्पपूर्ती टप्प्यात नाही

मुंबईतील पहिल्या ‘एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे’ची प्रतीक्षाच; अद्यापही प्रकल्पपूर्ती टप्प्यात नाही

मुंबई : मलबार हिल परिसरात मुंबईतील पहिली तरंगती पायवाट म्हणजेच एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२४ मध्ये पर्यटकांसाठी खुला केला जाणार होता. मात्र, आता नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातही तो सुरू होण्याची शक्यता नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मलबार हिलच्या गर्द झाडीतून हा वॉकवे तयार करण्यात आला आहे. या ठिकाणावरून गिरगाव चौपाटीचे सौंदर्य पाहायला मिळणार आहे. ४८२ मीटर लांबीच्या या वॉकवेचे आतापर्यंत  ९० टक्के काम झाले आहे. हा वॉकवे बांधत असताना मर्यादित कामाच्या तासांपर्यंत वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासह अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. 

झाडांसाठी मार्गात बदल 
-    झाडे वाचवण्यासाठी अनेक वेळा वॉकवेचे संरेखन बदलण्यात आले. त्यामुळे वॉकवेची लांबी कमी झाली, तर २.२ मीटर रुंद असलेला हा वॉकवे जवळपास एक किलोमीटरचा असेल. त्याची वहनक्षमता सुमारे ५०० किलो चौरस मीटर इतकी आहे. ज्या खांबावर हा वॉकवे उभारण्यात आला आहे, ते काँक्रीटऐवजी स्ट्रक्चरल स्टील वापरून बनवण्यात आले आहेत.
-    डिसेंबर २०२४ मध्ये हा वॉकवे पर्यटकांसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत प्रशासनाची कोणतीच हालचाल नाही. 

एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवेचे काम अंतिम टप्प्यात आहे; पण तो अजून पूर्ण झालेला नाही. या महिनाभरात तिकीटघर आणि अन्य बाबी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत २५ कोटी रुपये खर्च झाला असला, तरी यापुढे अजून खर्च वाढण्याची शक्यता आहे. - महापालिका अधिकारी

कसा असेल याचा मार्ग? 
मुंबईत बांधण्यात येत असलेल्या वॉकवेमागे सिंगापूरच्या जंगलातील प्रसिद्ध एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवेची प्रेरणा आहे. हा ४८२ मीटरचा एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कपासून सुरू होणार असून, तो डुंगरवाडी इथपर्यंत आहे. या वॉकवेवरून जाताना मुंबईकरांना निसर्गरम्यतेचा अनुभव घेता येणार आहे. 

अतिशय सुंदररीत्या लाकडापासून तयार करण्यात आला असून, तो  साकारताना कमीत कमी काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. या वॉकवेवरून चालताना अरबी समुद्राचे सौंदर्य अनुभवता येणार आहे. यासाठी आतापर्यंत २५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या वॉकवेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण, रंगकाम, शौचालय आणि तिकीट काउंटरचे काम पूर्ण केले जात आहे. 
 

Web Title: Mumbai's first 'elevated forest walkway' still awaited; project not yet in completion stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.