अखेर मृत्यूशी झुंज संपली...! मुंबईच्या 'निर्भया'चा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 12:14 AM2019-08-29T00:14:52+5:302019-08-29T06:26:41+5:30
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भावाकडे राहण्यासाठी गेली होती.
औरंगाबाद : मुंबईतील चेम्बूर परिसरात चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्यापासून अत्यवस्थ झालेल्या १९ वर्षीय पीडितेची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज बुधवारी रात्री अखेर थांबली. येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान बुधवारी (२८ ऑगस्ट) रात्री ९ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्यावर महिनाभरापासून उपचार सुरू होते.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाºया भाऊ, भावजयीकडे राहण्यासाठी गेली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडल्यानंतर चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून ती आजारी पडली. तिचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. मात्र नराधमांनी दिलेल्या धमक्यांमुळे भेदरलेल्या पीडितेने अत्याचाराची माहिती नातेवाईकांना अथवा पोलिसांना सांगितली नव्हती. दरम्यान, तिची प्रकृती अधिक खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब तिच्या आई-बाबांना सांगितली. यानंतर त्यांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा रडतच तिने आपबिती सांगितली.
यानंतर तिच्या वडिलांनी पीडितेवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला. घाटीतील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिला असाध्य आजाराने ग्रासल्याचे त्यांना समजले. २५ जुलैपासून सुरू असलेल्या उपचारांना पीडितेचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनाही यश आले नाही आणि तिची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अखेर थांबली.
अत्याचारामुळे प्रचंड मानसिक धक्का
चार नराधमांनी केलेल्या सामुहिक अत्याचारामुळे पीडितेला शारिरीक वेदनेसह प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आले नाही. अत्याचारामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने तिची प्रकृती अधिक नाजूक अवस्थेत गेली होती. गेल्या महिन्याभरापासून या पिडीतेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.