मुंबई : गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मुंबापुरीच्या गणेश उत्सवावर कोरोनाचे विघ्न असले तरीदेखील यंदाचा गणेशोत्सव थाटामाटात साजरा करण्यासाठी मुंबईकरांनी कंबर कसली आहे. मुंबापुरीत गणेश उत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, कुर्ला येथील राहुल आर्ट या गणेशमूर्ती कार्यशाळेतून दीड फूट गणपतीबाप्पाची शाडूच्या मातीची मूर्ती हवाईमार्गे बेल्जियमला रवाना झाली आहे.
कुर्ला येथील राहुल आर्टमध्ये ही मूर्ती साकारण्यात आली. मूर्तिकार प्रशांत देसाई यांनी शाडूच्या मातीपासून अवघ्या आठ दिवसांत ही मूर्ती साकारली आहे. या मूर्तीची उंची दीड फूट आहे. गणेशमूर्ती पूर्णतः इको फ्रेंडली असून, या कार्यशाळेतून पहिल्यांदाच बेल्जियमला गणेशमूर्ती रवाना झाली आहे. कुर्ल्याहून गणेशमूर्ती सोमवारी सांताक्रूझ येथील राष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली आणि तिथून राजस्थान येथे पोहोचल्यानंतर आता बेल्जियमला रवाना होत आहे.
बेल्जियमला ही गणेश मूर्ती कोणत्या भक्ताकडे विराजमान होणार आहे? याबाबत कार्यशाळेकडून माहिती देण्यात आली नसली तरी श्री सिद्धिविनायक मंदिराच्या गुरुजींकडून यासंदर्भातले बोलणे होत असल्याचे सांगण्यात आले. राहुल आर्टचे राजेंद्र घोणे आणि राहुल घोणे यांनी यासाठी मेहनत घेतली आहे.