मुंबईचा कचरा समुद्रात जाण्यास अटकाव; ट्रॅश ब्रूम’ यंत्रणा कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 04:18 AM2019-06-07T04:18:19+5:302019-06-07T06:39:30+5:30
पालिकेचा निर्णय : अडवलेला कचरा काढण्यासाठी मुनष्यबळाचा वापर
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातून वाहत असलेल्या नाल्यांलगतच्या नागरी वस्त्यांमधून नाल्यात कचरा टाकला जातो. हा कचरा नाल्यांच्या पाण्यावर तरंगत प्रवाहाद्वारे समुद्रात मिसळतो; आणि भरतीच्या वेळी समुद्राला उधाण आले की पुन्हा किनाऱ्यावर येतो. हे चक्र थांबावे आणि कचरा नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे समुद्रात वाहून जाऊ नये याकरिता मुंबई महापालिकेने नाल्यात ‘ट्रॅश ब्रूम’ ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्राला भरती असते तेव्हा ट्रॅश ब्रूम खºया अर्थाने नाल्यात काम करते. कारण भरतीच्या वेळी पाणी वर असते आणि जेव्हा ओहोटी असते तेव्हा ट्रॅश ब्रूम खाली पडून राहते. जे पाणी झोपड्यांतून अथवा नागरी वस्त्यांतून नाल्यात येते त्या पाण्यात कचरा विशेषत: प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर असते. प्लॅस्टिक बॉटल, प्लॅस्टिक पिशव्या यांचा यात समावेश असतो.
हा कचरा नाल्यात टाकला जातो तेव्हा तो नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे सरकत जातो आणि जो जड कचरा असतो तो पाण्याच्या तळाला जाऊन बसतो. नाला साफ केला जातो तेव्हा तळाशी असलेला कचरा काढला जातो. तरंगणारा कचरा नाल्याच्या प्रवाहासोबत वाहत समुद्राच्या दिशेने जातो. येथे ट्रॅश ब्रूम काम करते. नाल्याच्या प्रवाहासोबत पाण्यावर तंरगणारा कचरा याद्वारे अडवला जातो. म्हणजेच एका अर्थाने तो समुद्रात जात नाही. अडवलेला कचरा पालिकेकडून काढला जात असल्याने नालाही साफ राहतो. शिवाय पाण्याचा प्रवाहदेखील कायम राहतो. ही यंत्रणा खर्चीक नाही. मनुष्यबळ वापरून अडवलेला कचरा काढण्यात येत असल्याने यास जास्त वेळही लागत नसल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. ही यंत्रणा पावसात अधिक उपयुक्त ठरेल.
...तर पाणीपुरवठा करणार खंडित
महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे वेगात सुरू असून ती आता अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे वेळापत्रकानुसारच करावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. साफसफाई करण्यात आलेल्या नाल्यांमध्ये काही परिसरात कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नाल्याच्या कडेला जाळी व फ्लोटिंग ब्रूम बसविण्यासह लोकांना कचरा न टाकण्याबाबत पालिकेकडून विनंती करण्यात येत आहे. विनंती करूनही कचरा टाकला जात असेल तर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दंडात्मक कारवाई करूनही प्रतिसाद मिळत नसल्यास संबंधित परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
नाल्यांसह समुद्राचीही स्वच्छता
शहर आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पूर्व उपनगरातील नाल्यांतही लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. या यंत्रणेद्वारे नाल्यातील पाण्यावर तरंगणारा कचरा अडवत तो काढला जाईल. यामुळे नाल्यांसह समुद्रही स्वच्छ राहण्यास मदत होईल.
ट्रॅश ब्रूम बसविण्यात आलेली ठिकाणे
दहिसर नाला, पोईसर नदी, इर्ला पम्पिंग स्टेशन, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन, एसएनडीटी नाला, पी अँड टी नाला, मेन अॅव्हेन्यू नाला, ओशिवरा नदी, मोगरा नाला.