मुंबईतील मुलींचा गुजरातमध्ये सौदा
By admin | Published: April 22, 2015 03:32 AM2015-04-22T03:32:21+5:302015-04-22T03:32:21+5:30
मुंबईसारख्या शहरांमधून नोकरीचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या मुलींची गुजरातच्या खेडेगावांमध्ये विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव
मुंबईसारख्या शहरांमधून नोकरीचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या मुलींची गुजरातच्या खेडेगावांमध्ये विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव नुकत्याच पायधुनी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास केला तेव्हा अहमदाबादेतल्या बकराना गावात मुलींचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने येथील पुरुष देशाच्या कानाकोपऱ्यातून पळवून आणलेल्या मुलींना खरेदी करून त्यांच्याशी बळजबरीने विवाह करीत असल्याचे उघडकीस आले.
दक्षिण मुंबईतील २२ वर्षांची सहिदा (नाव बदलले आहे) हिची बकराना गावातल्या अविवाहित पुरुषांना लग्नासाठी मुली विकणाऱ्या टोळीशी गाठ पडली आणि नंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याच्या थापेला बळी पडली. तिचाही सौदा झाला. एका ४५ वर्षांच्या इसमाने तिला दोन लाख रुपयांना विकत घेतले आणि विवाह करून तिच्यावर सतत १५ दिवस शारीरिक अत्याचार केले. त्याच्या कैदेतून कशीबशी निसटल्यावर तिने मुंबई गाठली आणि पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचली. सहिदाने मुंबई सोडल्यापासून परतेपर्यंतचा प्रवास आपल्या जबाबातून पायधुनी पोलिसांना सांगितला.
सहिदाच्या घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे लहानमोठी कामे करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावणे अपरिहार्य होते. मोठी बहीणही एका कॅटरिंगवाल्याकडे मजुरी करत होती. याच कॅटरिंगवाल्याकडे काम करणारी मीराबाई साळवेच्या ओळखीने चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात याची कुणकुण सहिदाच्या बहिणीला लागली. मावशी म्हणून ओळख असलेल्या मीराबाईकडे लगेचच बहिणीने सहिदासाठी शब्द टाकला. पण नोकरीसाठी गुजरातेत राहणे भाग होते. आई-वडिलांची परवानगी घेऊन सहिदाने सामानाची बांधाबांध केली. २८ मार्चला ती अहमदाबादला निघाली. तिच्या जोडीला मोठी बहीण आणि मीराबाई होत्याच. मीराबाईसोबत आणखी चार अल्पवयीन मुली अहमदाबादला नोकरीच्या शोधात निघाल्या होत्या.
अहमदाबाद स्थानकात मुलींचा सौदा करणारी सीमा, तिचे दोन साथीदार मीराबाईची आणि तिने सोबत आणलेल्या मुलींची वाटच पाहत होते. सीमा या सर्व मुलींना घेऊन एका घरात गेली. तेथे पोहोचल्यानंतर रशिदा बहिणीला सोडून मीराबाईसोबत घरी परतली. दुसऱ्या दिवशीच ४५ वर्षांच्या इसमाने सहिदाला पसंत केले. सहिदाचा सौदा ठरलाही. हे काही भलतेच सुरू आहे याची जाणीव एव्हाना सहिदाला झाली होती. सीमाकडे विचारणा केली तेव्हा तुला याने १ लाखात विकत घेतलेय. तुझ्यासोबत आलेल्या चौघींचाही सौदा ठरलाय, असे सुनावले. तेव्हा मात्र सहिदाच्या पायाखालची जमीनच सरकली. सहिदाला विकत घेणाऱ्याने तिच्याशी जबरदस्ती लग्न केले आणि घरी नेऊन सलग १0 दिवस सहिदावर अत्याचार केले. यादरम्यान सहिदाने धाडस करत एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसला.
६ एप्रिलच्या रात्री मात्र सारे गाढ झोपेत असल्याची संधी साधून सहिदा रात्री बाराच्या सुमारास नजरकैद भेदून बाहेर पडली. हमरस्त्यावर एका ट्रकचालकाने मदत करीत तिला अहमदाबाद रेल्वे स्थानकानजीक सोडले. तेथून ती मुंबईला आपल्या घरी परतली. भीतीपोटी, लाजेखातर तिने घरच्यांना काहीच सांगितले नाही. मात्र तिच्यासोबत अहमदाबादेत नोकरीसाठी गेलेल्या तरुणींचे पालक सहिदाच्या घरी धडकले. त्यांनी आपल्या मुलींची चौकशी सुरू केली. त्यात तिने त्यांना घडला प्रकार सांगितला. साऱ्यांनी चर्चा केली आणि पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढे सहिदाने पायधुनी पोलीस ठाणे गाठून आपल्यावर ओढवलेला सारा प्रसंग कथन करीत तक्रार दाखल केली.