मुंबई : गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईभोवतालच्या हरित कवचामध्ये ४२.५ टक्क्यांची घट झाली आहे. १९८८ मध्ये मुंबईच्या ६३,०३५ हेक्टर या क्षेत्रफळामध्ये २९,२६० हेक्टरचे हरित कवच होते. जे २०१८ मध्ये १६,८१४ हेक्टर इतकेच राहिले आहे. ३० वर्षांमध्ये १२,४४६ हेक्टर परिसरावरील हरित कवच नष्ट झाले आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा मोठा आहे.हरित कवच कमी झाल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. कार्बन उत्सर्जन वाढले आहे. जागतिक तापमानवाढ, अनियोजित विकास आणि हरित कवचाचे प्रमाण कमी होणे यामुळेच सध्या मुंबईत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. ‘स्प्रिंगर नेचर मुंबई’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली.वातावरण फाउंडेशनच्या वतीने बायोडायव्हर्सिटी बाय द बे या अभियानांतर्गत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये या अहवालावर चर्चा झाली. पर्यावरणवादी, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील व शहरातील कायद्याचे विद्यार्थी एकत्र आले होते. पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद, वकील गायत्री सिंह, वकील झमान अली यांनी मुंबईतील सध्याच्या पाणथळ भागांचे व्यवस्थापन व संरक्षण आणि शाश्वत अशी धोरणे तयार करण्यासाठी कायद्यातील कोणत्या गोष्टींचा आधार घेता येईल, याची चर्चा केली.मुंबईची नैसर्गिक संपत्ती वेगाने लुप्त होत आहे. तरुणाईने विशेषत: तरुण वकिलांनी कृतिशीलपणे व संरक्षणाबद्दल व्यवस्थित माहिती घेऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. आज आपल्या देशात जी काही जैवविविधता बाकी आहे त्याचे संरक्षण न्याय व्यवस्थाच करू शकते, असे स्टॅलिन दयानंद म्हणाले.विकासाचे स्वागत,पण पर्यावरण सांभाळावातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभाट यांनी सांगितले की, विकासाचे स्वागतच आहे,पण पर्यावरणाचा बळी देऊन तो व्हायला नको. भोवतालच्या जैवविविधतेकडे आपण कानाडोळा केला तर त्याची किंमत आपल्या भावी पिढीला मोजावी लागेल. आताच कृती केली नाही तरनंतर खूप उशीर होईल. पर्यावरणासंबंधी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आम्ही राजकारणी, सनदी अधिकाऱ्यांसोबत काम करण्यास तयार आहोत.
मुंबईचे हरित कवच ४२.५ टक्क्यांनी घटले, ‘स्प्रिंगर नेचर मुंबई’चा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 6:46 AM