'मुंबईचे पाहुणे' फ्लेमिंगोंची शिकार करणं पडलं महागात; पाच जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 07:23 PM2018-07-16T19:23:57+5:302018-07-16T19:24:39+5:30
५ जणांना वनखात्याच्या मॅग्रोव्हज विभागाने केली अटक
मुंबई - परदेशातून आलेले मुंबईचे पाहुणे म्हणून ओळख असलेल्या आणि मालाड येथील मालवणीत आश्रय घेतलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांची बंदुकीने शिकार करणाऱ्या पाच जणांना वनखात्याच्या मॅग्रोव्हज विभागाने अटक केली आहे. त्यांच्याजवळील बंदूक त्यांनी सर्व्हिसिंगला दिल्याने ती जप्त करण्यात आलेली नाही.
१० जुलै रोजी हे पाच जण मालाड पश्चिमेच्या मालवणी गावातील ९० फूट रोडवर खाडीकिनारी मरीना कंपाऊंड येथील सोनाटा इमारतीजवळून बंदूक घेऊन कांदळवनाच्या दिशेने जाताना स्थानिकांनी पाहिले होते. कांदळवनात परदेशी फ्लेमिंगो पक्ष्यांची शिकार करून ते मृत फ्लेमिंगोंना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून घेऊन जात होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांची छायाचित्रे काढून ‘पॉझ’ या पशूप्रेमी संघटनेला पाठवली होती. त्यावरून या संघटनेने पोलीस आणि वनखात्याकडे तक्रार केली होती. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये फ्लेमिंगो या पक्ष्यांचा समावेश शेडय़ूल ५ मध्ये होतो. त्यांच्या शिकारीला कायद्याने बंदी आहे.