वारसा मुंबईचा! भागडचुरीची गोष्ट; स्थानिक राजांचा दिल्लीच्या सलतनतीला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:15 AM2020-06-28T01:15:29+5:302020-06-28T01:15:44+5:30
महिकावतीच्या बखरीमध्ये भागडचुरीची कथा येते. जैतचुरी आणि त्यानंतर त्याचा मुलगा भागडचुरीही राज्यकारभारात लक्ष घालू लागला. कालांतराने भागडचुरी उन्मत्त झाला.
डॉ. सूरज अ. पंडित
मुंबई परिसरात तुर्काण झाले ! कमकुवत होत जाणाऱ्या दख्खनी साम्राज्यांचा आणि सार्वभौमत्वाकडे वाटचाल करणाऱ्या दिल्लीच्या सलतनतीचा फायदा अनेक स्थानिक राजांना होत होता. त्यांची छोटीछोटी राज्ये सांभाळण्यासाठी अनेक सरदार आणि देसले यांची साथ लागत असे. त्यांच्यातील राजकारण आणि सत्ताकारण मर्यादित सत्तालोलुपतेला जन्म देऊन स्थानिक राजांची डोकेदुखी बनत होते. अर्थातच, दिल्लीच्या मोठ्या राजकीय पटलावर या साऱ्यांचा वेगळाच डाव रंगत होता.
महिकावतीच्या बखरीमध्ये भागडचुरीची कथा येते. जैतचुरी आणि त्यानंतर त्याचा मुलगा भागडचुरीही राज्यकारभारात लक्ष घालू लागला. कालांतराने भागडचुरी उन्मत्त झाला. तो राजालाही जुमाननेसा झाला. त्याच्या अन्याय्य वागणुकीमुळे देसल्यांनी एकत्र येऊन राजाकडे गाºहाणे घातले. मालाडचा सोमदेसला आघाडीवर होता. त्याचा बदला घेण्यासाठी भागडचुरीने मालाडच्या देसल्यांचे संपूर्ण खानदान कैद केले. त्याची वक्रदृष्टी त्याच्या सुनेवर होती. तिच्या नवºयाचा खून करून तिला पळवण्याचा त्याने घाट घातला. या पार्श्वभूमीवर गर्भवती असलेली ती मालाड सोडून भिवंडीला पळून गेली. तिथे आश्रित असताना तिला मुलगा झाला. हा मुलगा सुडाग्नीने धगधगतच मोठा झाला. त्याने पुन्हा स्थानिक देसल्यांना एकत्र करून भागडचुरीचा काटा काढण्याची योजना आखली. भागडचुरीची कुलदेवी असलेल्या मढच्या हरबीदेवीच्या यात्रेत भागडचुरीचा खून करण्याचा पहिला प्रयत्न झाला. स्थानिक नावाड्यांच्या मदतीने भागडचुरीने पळ काढला.
भागडचुरीने याचा बदला घेण्यासाठी दिल्लीश्वराशी (हा राजा मुहम्मद बीन तुघलक असावा) संधान बांधून नागरशहाविरुद्ध बंड केले. नागरशाहीचा अंत झाला. दिल्लीश्वराने भागडचुरीला राजा केले. राज्यावर येताच स्थानिक देसल्यांविरोधात त्याने मोहीम उघडली. त्याच्या या वागण्याने तो सरदार व देसल्यांमध्ये नकोसा होऊ लागला. पुन्हा हरबीदेवीच्या जत्रेला गेला असताना त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. यावेळी मात्र स्थानिक कोळी व नावाड्यांची साथ देसल्यांना होती. भागडचुरी मढहून पळाला. नावेतून जात असताना स्थानिक नावाड्यांच्या मदतीने भागडचुरीचा वध झाला. त्यानंतर, दिल्लीश्वराने त्याचा पुत्र लहुरशाला गादीवर बसवले. लहुरशाने मात्र स्थानिक सरदार व देसल्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न केला. मढच्या आताच्या हरबीदेवीच्या देवळाच्या परिसरात संदीप दहिसरकर यांना पुरातत्त्वीय गणवेशात १३-१४ व्या शतकांतील मंदिराचे अवशेष सापडले आहेत. अर्थात, या कथेची ऐतिहासिकता सिद्ध करण्यासाठी सबळ पुराव्यांची गरज आहे.
मढ, भिवंडी, कळवा आणि भाईंदरच्या खाडीत घडलेले असे अनेक प्रसंग महिकावतीच्या बखरीमध्ये वर्णिले आहेत. त्यात स्थानिक कोळी, नावाड्यांची साथ होती. शिलाहार काळापासूनच या दर्यावर्दीचे महत्त्व अबाधित होते, हे आपण पूर्वीच मार्कोेपोलोच्या वृत्तान्तावरून पाहिले आहे. चौदाव्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतरे होत होती. खिलजी आणि तुघलकांच्या आधीपासूनच गुजरातमध्ये राजकीय वादळे यायला लागली होती. या स्थलांतरांमध्ये अनेक जाती आणि जनजातींचा समावेश होता. पुढील काही लेखांत आपण अशाच स्थलांतरितांचा आढावा घेणार आहोत.
महिकावतीच्या बखरीमध्ये अशीच एका भागडचुरीची कथा येते. पतनाच्या काळात नागरशानामक मुंबई परिसरातील स्थानिक राजाचे प्रस्थ वाढत गेले आणि पुढे तो राजा झाला. त्याच्याबरोबर त्याचा मानलेला मुलगा जैतचुरी राज्यकारभार पाहू लागला. काही वर्षांतच या जैतचुरीचा मुलगा भागडचुरीही राज्यकारभारात लक्ष घालू लागला. हा भागडचुरी त्याच्या वडिलांसारखाच शूर व पराक्रमी होता.
(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)