मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा होणार जीर्णोद्धार;मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:36 PM2023-12-18T14:36:01+5:302023-12-18T14:46:33+5:30
बाणगंगा तलावाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
मुंबई: मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन कॅबिनेट मंत्री तथा स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या डी विभागामार्फत बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विविध कामे पूर्ण केली जाणार आहेत.
प्रस्तावित प्रकल्पात तलावा सभोतालच्या परिसराची स्वच्छता, रामकुंड परिसराची स्वच्छता, बाणगंगा तलावाची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची, संरक्षक भिंतींची, दीपस्तंभाची, दुरुस्ती आणि जीर्णोद्धार, तलावाच्या आतील बांधकाम काढणे, बटरफ्लाय झडपेची दुरुस्ती आणि सुधारणा इत्यादी कामांचा समावेश आहे. मंत्री लोढा यांनी परिसरातील अतिक्रमणे हटवून त्याचे वारसापण पुनर्संचयित करण्याची योजना आखली असून, यामुळे ऐतिहासीक महत्व प्राप्त असलेल्या राम कुंडाचा कायापालट होणार आहे.
मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा जीर्णोद्धार!
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) December 18, 2023
मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे आज भूमिपूजन केले. @mybmc च्या डी विभागामार्फत या प्रकल्पांतर्गत तलावाच्या पायऱ्यांची, संरक्षक भिंतीची, दीपस्तंभाची दुरुस्ती तसेच… pic.twitter.com/CzQuRzkBp8
बाणगंगा तलावाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या तलावाचे प्राचीन महत्त्व लक्षात घेऊन विविध भाविक आणि देश विदेशी पर्यटकही याठिकाणी येतात. त्यामुळे वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला महाराष्ट्र सरकारने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. बाणगंगा तलाव विकास प्रकल्पामुळे शहरातील एक लक्षणीय पर्यटनस्थळ म्हणून बाणगंगा तलाव परिसर विकसित होईलच, पण त्याचबरोबर नागरिकांच्या धार्मिक भावना सुद्धा जपल्या जातील.