Join us

मुंबईकरांना आॅक्टोबर हिट तापदायक!

By admin | Published: October 02, 2015 4:12 AM

आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसाने मुंबईकरांना घाम फोडला असून, १ आॅक्टोबरचे मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश एवढे नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसाने मुंबईकरांना घाम फोडला असून, १ आॅक्टोबरचे मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश एवढे नोंदविण्यात आले आहे. परिणामी, वाढत्या कमाल तापमानाने मुंबईकरांच्या अंगाची काहिली झाली असून, हा संपूर्ण महिना मुंबईकरांना तापदायक ठरणार आहे.गेल्या तीन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान सलग ३७ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे. तत्पूर्वी हे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत होते. कमाल तापमानात तब्बल ४ अंशाची वाढ नोंदविण्यात आली आहे. किमान तापमानही २७ अंशाच्या घरात दाखल झाले आहे. तत्पूर्वी हे किमान तापमान २४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत होते. किमान तापमानात ३ अंशाची वाढ झाली आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईकरांना आॅक्टोबर हिटच्या झळा बसू लागल्या असून, पुढील ४८ तासांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशाच्या घरात नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, आता सुरू झालेला आॅक्टोबर हिट महिनाभर तरी मुंबईकरांचा घाम काढणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, परतीच्या पावसाने उत्तर भारतातून माघार घेतली आहे. गुरुवारी पश्चिम उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग, पूर्व उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग आणि मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, गुजरात व उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांतून मान्सून माघारी परतला आहे. आता परतीचा पाऊस राज्याच्या उत्तर सीमेवर असून, मुंबईत तर पावसाने कधीचीच विश्रांती घेतली आहे. परिणामी, शहराच्या कमाल आणि किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ नोंदविण्यात येत आहे. स्कायमेट काय म्हणते?आॅक्टोबर महिन्यात भारतात दोन ऋतू बदलत असतात. पावसाळा संपून हिवाळ्याकडे वाटचाल सुरू असते. याच काळात संपूर्ण भारतात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे वातावरण अनुभवावयास मिळते. सध्या स्वच्छ आकाश आणि लख्ख सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या तापमानात वाढ होते आणि रात्रीचे तापमान मात्र कमी झालेले जाणवते. भारताच्या पश्चिमेकडील भागांत म्हणजेच गुजरात आणि राजस्थानात एक प्रकारे दुसरा उन्हाळाच अनुभवास मिळतो. कारण या भागातील कच्छ, भूज आणि नलिया या ठिकाणी दिवसाचे तापमान ४० अंशावर पोहोचते. (प्रतिनिधी)