मुंबईच्या इशिताची सीबीएसईत बाजी, दहावीत मिळविले ९९.४ टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:36 AM2020-07-16T03:36:21+5:302020-07-16T03:36:54+5:30

बिलबाँग हाय इंटरनॅशनल स्कूलच्या इशिताने केवळ मॉक टेस्ट, एक्स्ट्रा बुक्स, एनसीईआरटीची पुस्तके आणि शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन यांच्या साहाय्याने हे यश मिळविले आहे.

Mumbai's Ishita wins CBSE, gets 99.4% marks in 10th | मुंबईच्या इशिताची सीबीएसईत बाजी, दहावीत मिळविले ९९.४ टक्के गुण

मुंबईच्या इशिताची सीबीएसईत बाजी, दहावीत मिळविले ९९.४ टक्के गुण

Next

मुंबई: बुधवारी सीबीएसई मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. यात मुंबईच्या इशिता जैनने ९९.४ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे. इशिता प्रमाणेच मुंबईतील अनेक सीबीएसई शाळांतील विद्यार्थ्यांनी ९५% पार गुण मिळवीत बुधवारी जाहीर झालेल्या निकालात यशाचा झेंडा रोवला आहे.
बिलबाँग हाय इंटरनॅशनल स्कूलच्या इशिताने केवळ मॉक टेस्ट, एक्स्ट्रा बुक्स, एनसीईआरटीची पुस्तके आणि शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन यांच्या साहाय्याने हे यश मिळविले आहे. तर, रायन इंटरनॅशनल स्कूलच्या कांदिवली शाखेतील खुशी वांदिलेनेही ५०० पैकी ४९५ गुण मिळवीत ९९ टक्के गुण मिळविले आहेत. निकालाची धाकधूक, त्यात लॉगिन होत नाही अशा अडचणी असताना खुशीला आपल्याला ९९ % गुण मिळाल्याचा मेसेज आला आणि तिला आनंदाचा धक्का बसला. त्याच शाळेतील आयुष्य कुमारने ५०० पैकी ४९३ गुण मिळवीत ९८.६ टक्के गुण मिळविले आहेत.
अ‍ॅण्टॉप हिल येथील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या आरोही देशपांडेनेदेखील ५०० पैकी ४९० गुण मिळवीत ९८ % गुण मिळविण्यात यश मिळविले आहे. संस्कृत विषयात तिला १०० मार्क मिळाले आहेत. अभ्यास करताना बदललेल्या पेपर पॅटर्नला न घाबरता त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले, असे तिने सांगितले.
बिलबाँग हाय इंटरनॅशनल स्कूलच्या क्षितिज अग्रवाल यालाही ९८.६ % गुण मिळाले आहेत. राजहंस विद्यालयाच्या आलीया सय्यद आणि उमंग पुरोहित यांनीही शाळेची मान उंचावली आहे. या दोघांनाही ९८% गुण मिळाले आहेत. यंदा सीबीएसई मंडळाच्या पेपर पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला असला तरी विद्यार्थी हिताचे असल्याने सीबीएसई विद्यार्थ्यांना जास्त अडचणी आल्या नसल्याचे मत शिक्षक, मुख्याध्यापकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुलांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे.

मला ९५ टक्के गुण मिळतील याची खात्री होती. मात्र ९९.४ % मिळाल्यानंतर माझा आत्मविश्वास सार्थकी लागला. भविष्यात आयआयटी जॉईन करायचे असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरूआहेत.
- इशिता जैन

दैनंदिन अभ्यास आणि ठरलेले वेळापत्रक याच्या साहाय्याने वर्षभर अभ्यास केला. पण, शेवटचे ३ महिने विशेष मेहनत घेतली. या काळात मॉक टेस्ट सोडविण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. विज्ञान व गणित विषयांमध्ये पुढे संशोधन करायची इच्छा असून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू आहे. - खुशी वांदिले

अभ्यासाचे टेन्शन न घेता अभ्यास केला तर यश अवघड नाही. यापुढे अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे. अभ्यासात आई-वडील, शिक्षकांसह आजीचा विशेष वाटा आहे. योगा, मेडिटेशन, सिनेमे पाहत मी अभ्यास केला. - आरोही देशपांडे

शाळा व क्लास येथील शिक्षकांनी आपली आवश्यक तेवढीच तयारी करून घेतली. त्यामुळे परीक्षेच्या वेळी योग्य उत्तरे लिहिण्यासाठी मदत झाली. न्यूरोसर्जन व्हायचे असल्याने ‘नीट’साठीची तयारी जोरात सुरू आहे. - आयुष्य कुमार

आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे. आम्ही सातत्याने पाठिंबा देणारे आमचे पालक आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यामध्ये मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रेरित करण्याप्रति कटिबद्धता दाखवलेले आमचे शिक्षक यांचेदेखील आभार मानतो.
- ग्रेस पिंटो, व्यवस्थापकीय संचालक, रायन इंटरनॅशनल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स

पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूलच्या वेदांती ठाकूर आणि सारा देसाई या दोन विद्यार्थिनींचा परीक्षेच्या १५ दिवस आधी अपघात झाला. त्या जवळपास १० दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यावर मात करीत वेदांतीने ९४.६ टक्के गुण तर, साराने ८९.८ टक्के संपादन करून यश मिळविले.

रायन ग्रुप आॅफ स्कूल्सच्या
विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकाल संपादित केला.
कांदिवली येथील शाळेचे टॉपर्स
खुशी रविंद्र वांदिले - ९९ टक्के
संयुक्ता शिवकुमार - ९८.८ टक्के
हेत दिलीप गोहिल - ९८.८ टक्के
पूर्णश्री गुजरन - ९८.६ टक्के
आयुष कुमार - ९८.६ टक्के
जान्हबी रॉय - ९८.६ टक्के
क्रिश भंडारी - ९८.४० टक्के
माही मेहता - ९८ टक्के
चिन्मय मूरजानी - ९८ टक्के
मुस्कान पाहवा - ९७.६० टक्के
नेहा नाम्बियार - ९७.६० टक्के
सानपाडा येथील शाळेचे टॉपर्स
सत्यम व्यास - ९६.८ टक्के
इशिता मेहल - ९६.४ टक्के
संकल्प महापात्रा - ९६ टक्के
पनवेलच्या सेंट जोसेफ
हायस्कूल येथील टॉपर्स
दिक्षा दासोनी - ९८.४० टक्के
अदिती नार्वेकर - ९८ टक्के
जुई चावरकर - ९७.८० टक्के

Web Title: Mumbai's Ishita wins CBSE, gets 99.4% marks in 10th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.