Join us

मुंबईच्या जेजे मेडिकल कॉलेजचा दुसरा नंबर, वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे प्रथमच रँकिंग जाहीर

By संतोष आंधळे | Published: June 23, 2023 7:48 AM

यापुढे दर महिन्याला रँकिंग ठरणार असल्यामुळे आता प्रत्येक कॉलेजला दर महिन्याला कामाचा हिशेब शासनाला सादर करावा लागणार आहे.

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच सर्व मेडिकल कॉलेजांची आणि संलग्न रुग्णालयांची मासिक कामगिरी पाहून रँकिंग देण्यात आले आहे. त्यासाठी काही निकष ठरविण्यात आले असून त्यात अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अव्वल ठरले असून मुंबईतील ग्रँट मेडिकल (जेजे रुग्णालय) कॉलेज दुसऱ्या क्रमांकावर तर सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाचा तिसरा क्रमांक आला आहे. यापुढे दर महिन्याला रँकिंग ठरणार असल्यामुळे आता प्रत्येक कॉलेजला दर महिन्याला कामाचा हिशेब शासनाला सादर करावा लागणार आहे. याकरिता त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे गुण दिले जाणार आहेत.    सर्व महाविद्यालयांना कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील याचा नमुना यापूर्वीच वैद्यकीय शिक्षण विभागाकडून देण्यात आला होता.  त्या प्रश्नांची उत्तरे दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ई-मेलद्वारे सादर करावी लागणार आहेत. यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मे महिन्यातील कॉलेजची माहिती प्राप्त झाल्यानंतर कक्षातील अधिकारी यांनी सर्व माहितीचे विश्लेषण करून रुग्णालयांचे रँकिंग करण्यात आले.  

कॉलेजचे नाव आणि मिळालेले गुण

गोल्ड  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अंबेजोगाई) : ५९.२ ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय (मुंबई) : ५८.३  डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सोलापूर)  : ५६.१   विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (लातूर) ५०.३  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, (जळगाव) - ४५.५   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला - ३९.२ 

सिल्व्हर  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नांदेड) : ३८.१   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गोंदिया) : ३७.५  बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) : ३३.६   इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर) : ३१.९  राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (कोल्हापूर) : ३१.६  श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (धुळे) - २९.२ 

ब्राँझ  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) : २४.८  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (बारामती) : २४.०  श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (यवतमाळ) : २२.५  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (चंद्रपूर) : १७.२   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर) : १६.६  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज) : १४.२

महाविद्यालयांची कामगिरी तपासण्यात आली. त्यांना यापूर्वी काही निकष किंवा प्रश्न देण्यात आले होते. त्या सर्व गोष्टींची माहिती एकत्रित करण्यात आली. त्यानुसार गुण देऊन रँकिंग करण्यात आले आहे. यामध्ये काही वर्गवारी करण्यात आली. त्यानुसार गुण देऊन क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे कोणते महाविद्यालय काय काम करते हे सहजरीत्या लक्षात येते. त्यानुसार जर कमी  गुण असलेल्या महाविद्यालयांना काही अडचणी असतील तर त्यांनी इतर महाविद्यालयांतील सहकाऱ्यांची मदत घेऊन अडचणी सोडवाव्यात. हा या मागचा हेतू आहे. - डॉ. अश्विनी जोशी, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :वैद्यकीयमहाविद्यालय