मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईची लाइफलाइन लोकल आता आणखी अपग्रेड होणार आहे. मुंबईतील सातत्याने वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे लोकल वाहतुकीवर पडणारा प्रचंड ताण आणि त्यातून होणारे जीवघेणे अपघात, यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न रेल्वे मंत्रालय करत आहे. गर्दीच्या वेळी गाडी पकडण्याच्या नादात तोल जाऊन आतापर्यंत अनेकांना हकनाक प्राण गमवावे लागले आहेत. असे यापुढे घडू नये याकरिता रेल्वे मंत्रालयाने लोकल डब्ब्यांच्या दरवाजांवर 'सेफ्टी' सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रेल्वे चालू होण्याचा सिग्नल प्रवाशांना मिळेल. त्यामुळे ते गाडी पकडण्याची घाई करणार नाहीत.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यामध्ये त्यांनी या सेफ्टी सेन्सरची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मुंबई लोकलच्या डब्बांवर निळ्या रंगाची लाईट लावण्यात येणार आहे. ही लाईट प्रवाशांना ट्रेन सुरू होणार असल्याचे सिग्नल देणार आहे. त्यामुळे लोकलमध्ये चढताना होणाऱ्या दुर्घटना कमी होतील.''