Join us

मुंबईचे काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३६ टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लोकांना जागरूक करण्याबरोबरच निष्काळजीपणा करणाऱ्यांना शिक्षाही केली जात आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लोकांना जागरूक करण्याबरोबरच निष्काळजीपणा करणाऱ्यांना शिक्षाही केली जात आहे. याचाच परिणाम म्हणून मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबईचे काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अवघ्या १७ दिवसांत ३६ टक्क्यांनी कमी झाले आहे.

मुंबईतील पॉझिटिव्हीचे प्रमाण १ जून रोजी ३.५३ टक्के होते, १७ दिवसांत ३६ टक्क्यांनी खाली आले. १७ जून रोजी पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २.२७ टक्क्यांवर आले. ‘ब्रेक द चेन’ अभियानाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

३.७९ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आणि २३.५६ टक्के भरलेले ऑक्सिजन बेड यामुळे मुंबईचा समावेश आता दुसऱ्या स्तरातून (लेव्हल) पहिल्या स्तरात झाला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून (२१ जून) मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल होण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात मुंबई महापालिका अंतिम निर्णय जाहीर करेल. मुंबईत दररोज सरासरी ३० हजार लोकांची तपासणी केली जाते. काेराेनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांच्यावरही वेळीच उपचार केले जात आहेत. त्वरित उपचार आणि पाॅझिटिव्ह रुग्णांशी त्वरित संपर्क साधून विषाणूचा प्रसार थांबवला जात आहे. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी होणे ही एक सकारात्मक बाब असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले.

................................................