दिलासादायक : नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत झाले कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईतील काेराेना रुग्ण पॉझिटिव्हीटीचे प्रमाण ६.६९ टक्के हाेते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांसाठी समाधानकारक बाब म्हणजे, डिंसेबरच्या पहिल्या आठवड्यात ते कमी झाले असून ५.०३ टक्क्यांवर आले आहे. शिवाय, दैनंदिन रुग्णसंख्याही कमी झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईत २५ नोव्हेंबर रोजी १९ हजार १८ चाचण्या करण्यात आल्या, त्यात १ हजार ७२ रुग्ण आढळले होते, त्या वेळेस पॉझिटिव्हीटीचे प्रमाण ६.६९ टक्के होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी १६ हजार ३९४ चाचण्या कऱण्यात आल्या असून ८२५ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे आता पॉझिटिव्हीटीचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी झाले असून ५.०३ टक्क्यांवर आले आहे.
दिवाळीनंतर वाटत असलेला कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका कमी झाला आहे.
* ‘प्रदूषण वाढल्यास प्रादुर्भावाचा धाेका’
टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी डिसेंबर अखेरीस तापमानात घट होऊन प्रदूषण वाढल्यास प्रादुर्भाव पुन्हा वाढेल, असे मत मांडले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या १९ लाख ५५ हजार ३४२ चाचण्या झाल्या आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९१ टक्के आहे. २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचे प्रमाण ०.२९ टक्के असल्याची नोंद आहे. शहर, उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २४३ दिवसांवर पोहोचला आहे.
चौकट
कालावधी चाचण्या रुग्णसंख्या पॉझिटिव्हीटीचे प्रमाण (टक्क्यांत)
२५ नोव्हेंबर १९०१८ १२७२ ६.६९
२६ नोव्हेंबर १७९७३ ११६७ ६.४९
२७ नोव्हेंबर १६९०२ ११३६ ६.७२
२८ नोव्हेंबर १४५९२ ९२२ ६.३२
२९ नोव्हेंबर १०५३८ ७२१ ६.८४
३० नोव्हेंबर ११७०६ ७५८ ६.४८
१ डिसेंबर १६१५० ९६० ५.९४
२ डिसेंबर १५३९९ ८८० ५.७१
३ डिसेंबर १५८३२ ८२३ ५.२०
४ डिसेंबर १६३९४ ८२५ ५.०३
..........................................................