मुंबई : येथे राहणाऱ्या किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी प्रथमच वृंदावन येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात भाग घेतला आहे. त्या तेथील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. हा कुंभमेळा २५ मार्चपर्यंत चालणार आहे.
वास्तविक सखी यांचा जन्म गुजरातमधल्या वडोदरा येथे झाला आहे. त्या मुंबईत स्थायिक झाल्या. कारण त्यांचे वडील मुंबईत चित्रपट वितरक होते. बॉलिवूडचे राज कपूर यांच्यासोबत त्यांनी बरीच कामे केली आहेत. हिमांगी यांनी प्राथमिक शिक्षण काॅन्व्हेंट स्कूलमध्ये घेतले. आई आणि वडिलांच्या निधनानंतर हिमांगी यांचे शिक्षण सुटले. पुढे त्यांनी आपल्या बहिणीचे लग्न करून दिले. पोटापाण्यासाठी त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यानंतर प्रभू श्रीकृष्णाकडे त्यांचा ओढा वाढला. त्यांनी सर्वस्वाचा त्याग करत वृंदावन गाठले. तेथे गुरूंकडून दीक्षा घेत धर्मशास्त्राचा अभ्यास सुरू केला.
प्रवचनकर्त्या, भागवत कथावाचक म्हणून ओळख असलेल्या किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी सांगितले की, मी शिक्षण आणि दीक्षा वृंदावनमध्येच घेतली. येथेच शास्त्रांचा अभ्यास पूर्ण केला. ब्रजवासीयांसोबत येथे राहण्यास आवडते. मी माझे संपूर्ण तन, मन आणि धन श्रीकृष्णाचरणी अर्पण केले आहे. वृंदावनच्या कुंभपूर्व वैष्णव बैठकीत सखी भजन, कीर्तन व प्रवचनासोबतच भाविकांना दर्शन देत आहेत.