मुंबई : मेट्रो मार्गामुळे मोठी कनेक्टिव्हिटी तयार होत असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून थेट ठाणे, मीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रोने जाता येईल. आज पायाभरणी करण्यात आलेल्या तीन मेट्रो मार्गांवर १० वर्षांत १४० लाख प्रवासी दररोज प्रवास करणार असून, देशातील सर्वांत मोठे मेट्रो नेटवर्क मुंबईत होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी मेट्रो मार्ग १०, ११ आणि १२ या तीन मेट्रो मार्गिकांचे तसेच मेट्रो भवनचे भूमिपूजन, मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण, बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन रिमोटद्वारे करण्यात आले. या वेळी महामुंबई मेट्रोच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ३२० किलोमीटरच्या एमएमआरडीए क्षेत्राचे इंटिग्रेटेड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जास्तीतजास्त ६० मिनिटांत प्रवास व्हावा, अशी मेट्रोची योजना आहे.
देशातील सर्वांत मोठ्या मेट्रो कोच निर्मितीचे कंत्राट मेक इन इंडियाअंतर्गत बीईएमएल कंपनीला देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रोचे कोच आता देशात निर्माण होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नागपूर, मुंबई, पुणे येथे मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम सुरू आहे. याबरोबरच इलेक्ट्रॉनिक बस सुरू करणार आहोत. हायब्रीड मेट्रोच्या माध्यमातून छोट्यातील छोट्या रस्त्यावर मेट्रो वाहतूक सुरू करता येईल. नाशिक येथे हायब्रीड मेट्रोचे काम सुरू केले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम अमलात आणणारे मुंबई हे देशातील पहिले शहरइंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम अंमलात आणणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल. सन २०२१-२२ पर्यंत २१२ किमी आणि २०२३-२४ पर्यंत ८५ किमीचे मेट्रो काम पूर्ण होणार आहे. ही ग्रीन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असून २.५ कोटी टन कार्बन कमी करेल. मेट्रो भवनमध्ये सर्व मेट्रो वाहतुकीचे संचालन होणार असून आर्टिफिशियल इंटिलिजीन्सद्वारे मेट्रो चालणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
मेट्रो कोचची पाहणीकार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कोचचे अनावरण करण्यात आले. या वेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कोचची पाहणी केली. एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी या वेळी मेट्रो प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, राज्यमंत्र्यांची उपस्थितीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, खासदार राजन विचारे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्रिमंडळातील सदस्य राज्यमंत्री विद्या ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री योगेश सागर आणि राज्यमंत्री अविनाश महातेकर कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित होते.
योजना प्रत्यक्षात आणण्याचे काम सुरूमुंबई हे सर्वांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे शहर आहे. मुंबई शहराचा काळाशी सुसंगत असा विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन संयुक्तपणे काम करीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षांत वेगवेगळ्या योजनांचे भूमिपूजन करून योजना प्रत्यक्षात आणण्याचे काम सुरू आहे. - पीयूष गोयल, केंद्रीय रेल्वेमंत्री