मुंबईची लाइफलाइन चार वर्षांत ‘ई’ होणार; उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:45 AM2023-12-14T09:45:20+5:302023-12-14T09:45:59+5:30
मुंबईची ‘सेकंड लाइफलाइन’ असलेल्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात २०२७ पर्यंत सर्व गाड्या ई-बस करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबई :मुंबईची ‘सेकंड लाइफलाइन’ असलेल्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात २०२७ पर्यंत सर्व गाड्या ई-बस करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने पावलेही उचलत असून लवकरच ३ हजार २०० ई- बस समाविष्ट होतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधान परिषदेत देण्यात आली.
सुनील शिंदे, विलास पोतनीस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बेस्टच्या बसेसचा मुद्दा उपस्थित केला होता. सामंत म्हणाले की, आता ही संख्या ३३ लाखांवर गेली आहे. सद्यस्थितीत बेस्टकडे ३५ डबल डेकर व ४५ सिंगल डेकर ई-बसेस आहेत. ३,२०० बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे.
जास्त ई-बसेससाठी केंद्राकडेही पाठपुरावा करण्यात येईल. बेस्ट वर्कर्स युनियन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातील करारानुसार बेस्टचा स्वमालकीचा बसताफा हा ३ हजार ३३७ इतका कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी बेस्टने महानगरपालिकेकडे निधीची मागणी केली आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान महानगरपालिकेकडून बेस्टला ५ हजार ६७८ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे.
भाड्याच्या बस वाढविण्यावर भर :
बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या बसेसचा खर्च दर किलोमीटरला १९३.६४ रुपये इतका आहे. तर भाडेतत्त्वावरील बसेसचा खर्च दर किलोमीटरला १२० रुपये असा आहे. त्यामुळेच भाड्याच्या बसेसची संख्या वाढविण्यावर भर देणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.