म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी डिसेंबरमध्ये; १,३०० घरांसाठी ५ नोव्हेंबरला जाहिरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:20 AM2018-11-01T05:20:52+5:302018-11-01T06:47:33+5:30
किंमत कमी केल्यामुळे ग्राहकांना दिलासा
- अजय परचुरे
मुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळाची लॉटरी अखेर जाहीर होणार आहे. बराच काळ रखडलेल्या या लॉटरीला या वर्षी मुहूर्त मिळाला आहे. येत्या ५ नोव्हेंबरला ऐन दिवाळीत तब्बल १३०० घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून २० ते २५ डिसेंबरच्या दरम्यान लॉटरी फुटणार असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. म्हाडाने मुंबईकरांसाठी याआधी ११९४ घरांची लॉटरी काढण्यात येणार अशी माहिती दिली होती. मात्र आता घरांच्या संख्येत वाढ केली असून ही घरे १३०० पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. या माहितीला म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दुजोरा दिला.
म्हाडाने या वर्षी घरांसाठी किमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती या वर्षी २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. म्हाडाने १३०० घरांच्या किमतीही निश्चित केल्या आहेत. जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व माहिती अंतिम टप्प्यात आली असून येत्या ५ नोव्हेंबरला दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशीच म्हाडाची १३०० घरांची जाहिरात, कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत आणि त्यांच्या कमी करण्यात आलेल्या किमती जाहीर करण्यात येणार आहेत. जास्तीतजास्त मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीमध्ये सहभागी व्हायला मिळावे हा यामागचा उद्देश असल्याचे उदय सामंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
म्हाडाची मुंबईतील लॉटरी याआधी मे २०१८ मध्ये येणार होती. मात्र आधी जाहीर केलेल्या १००० घरांसाठी मुंबईमध्ये म्हाडाकडे जागाच उपलब्ध नव्हती. तसेच घरांच्या किमती वाढल्याने कोकण मंडळाच्या लॉटरीत लोकांनी पाठ फिरवली होती. त्यातच काही ठिकाणी ही महागडी घरे लॉटरी विजेत्यांनी परतही केल्याने म्हाडावर मोठी टीका झाली होती. यापासून बोध घेत नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनी घरांच्या किमती कमी करून मुंबईकरांना परवडणाºया घरांची दिवाळी भेट दिली आहे.
अशी जाहीर होईल लॉटरी
म्हाडाने आखलेल्या लॉटरीच्या कार्यक्रमानुसार ५ नोव्हेंबरला आॅनलाइन लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
त्यानंतर आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी, अर्ज स्वीकृती आणि छाननीसाठी बरोबर ४५ दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
त्यानुसार २३ किंवा २४ डिसेंबरला १३०० घरांची लॉटरी फुटणार आहे.
म्हाडाने ११९४ वरून लॉटरीत तब्बल १०६ घरांची वाढ करत घरे १३०० पर्यंत वाढवली आहेत.