मुंबईची मदार आता राखीव जलसाठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:19 AM2019-06-20T04:19:30+5:302019-06-20T06:34:02+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये नऊ टक्के कमी पाणी
मुंबई : तलावांमध्ये अपुरा जलसाठा असताना मान्सूनलाही यंदा विलंब झाला आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत सतत होणारी घट चिंतेचा विषय ठरला आहे. मात्र, राज्य शासनाने राखीव जलसाठ्यातून पाणी उचलण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार, नियोजन करण्यात आल्याने पुढच्या महिन्यापर्यंत मुंबईकरांची तहान भागविणे शक्य असल्याचा महापालिकेचा दावा आहे.
अपुºया पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये नऊ टक्के कमी जलसाठा जमा झाला. ही तफावत भरून काढण्यासाठी महापालिकेने १५ नोव्हेंबर, २०१८ पासून मुंबईत सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू केली आहे. आजच्या घडीला गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत तलावांमध्ये सर्वात कमी जलसाठा आहे. त्यातच वायू चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडल्याने, पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली.
तलावांमधून मिळणारे पाणी यावरच मुंबई अवलंबून आहे. त्यामुळे पाणी संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडून राखीव जलसाठा दोन महिन्यांपूर्वीच मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार, वैतरणा व भातसामधील मंजूर अतिरिक्त जलसाठा राखून ठेवण्यात आला आहे. या जलसाठ्यामुळे जुलै महिन्यापर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे जल अभियंता खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
आपत्ती काळासाठी आरखडा नाही!
१९७२ मध्ये मुंबईत दुष्काळ पडला होता़ त्यानंतर, २००९ मध्ये अपुºया पावसाने मुंबईची दैना उडवली़ २०१४ मध्येही पाण्याची बोंब होती, तरी पालिका प्रशासनाला शहाणपण सुचलले नाही. त्यामुळे यावेळीसही मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे़ १५ नोव्हेंबर, २०१८ पासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. महापालिकेच्या जल अभियंता खात्याचे हे अपयश असून, नियोजनाअभावी मुंबईत पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप नगरसेवक करीत आहेत. मात्र, पाण्याचे नियोजन केल्यामुळेच तलावांमध्ये कमी जलसाठा असूनही पाणीकपात वाढविण्याची वेळ आली नाही, असा बचाव अधिकारी करीत आहेत.
१५ नोव्हेंबर, २०१८ पासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू आहे. त्यामुळे मुंबईला सध्या तीन हजार ४२० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया महापालिकेच्या अखत्यारितील तलावांमध्ये सध्या जेमतेम एक लाख दशलक्ष लीटर जलसाठा आहे. गेल्या तीन वर्षांमधील हा सर्वात कमी जलसाठा आहे.
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे.
गळती व चोरीमुळे दररोज २५ टक्के म्हणजे सुमारे नऊशे दशलक्ष लीटर पाणी वाया जाते.