लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १४ अंश नोंदविण्यात आले. तर मुंबईचे किमान तापमान २१.४ अंश नोंदविण्यात आले. आता मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रवात तयार झाला आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान आता वाढू लागले असून, गुरुवारी मुंबईच्या कमाल तापमानाची नोंद ३४ अंश सेल्सिअस झाली. हवामानात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकर किंचित घामाघूम होत असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.