मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशांवर, नागरिक घामाघूम; अवकाळी पावसाचा इशारा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 01:23 AM2021-03-24T01:23:03+5:302021-03-24T01:23:21+5:30
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर असलेले चक्रीय क्षेत्र आता विदर्भ आणि छत्तीसगड लगतच्या भागावर आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमानाचा पारा पुन्हा चढू लागला असून, मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमान पुन्हा वाढले असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. काही दिवसांमध्ये तापमानात याचप्रकारे वाढ नोंदविण्यात येईल आणि उकाडाही कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर असलेले चक्रीय क्षेत्र आता विदर्भ आणि छत्तीसगड लगतच्या भागावर आहे. गेल्या चोवीस तासांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. गोवा आणि कोकणात हवामान कोरडे नोंदवण्यात आले. कोकण आणि गोव्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील कमाल तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली. किमान तापमानातही वाढ नोंदविण्यात येत असून यात आणखी वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान २४ मार्च रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.