मुंबई : मुंबईच्या हवामानात बदल नोंदवण्यात येत असून, शहराचे कमाल तापमान पुन्हा घटले आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान २८ अंश नोंदवण्यात आले असून, सोमवारसह मंगळवारी कमाल तापमान २८ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. तत्पूर्वी कमाल तापमानाने ३५ अंशाचा पारा गाठला होता. परिणामी, थंडीने गारठलेल्या मुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसला होता.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मुंबईच्या कमाल तापमानात आठवड्याभरापूर्वी घट नोंदवण्यात आली होती. कमाल तापमान २८ अंशावर घसरले होते. मात्र वातावरणात झालेल्या बदलामुळे कमाल तापमानाने ३५ अंशावर मजल मारली होती. परंतु पुन्हा कमाल तापमानात घसरण झाली असून, कमाल तापमान पुन्हा २८ अंशावर घसरले आहे. कमाल तापमानातील घसरण दोन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, कमाल तापमानात घसरण झाल्याने मुंबईतील वातावरण काहीसे ‘गार’ झाले असून, हे चित्र दोन दिवसांच्या फरकाने बदलणार आहे. परिणामी, मुंबईकरांना पुन्हा उकाड्याला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
मुंबईच्या कमाल तापमानात घट
By admin | Published: February 06, 2017 3:38 AM