लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे कमाल तापमान गेल्या तीन दिवसांपासून ३७ अंशांच्या घरात नोंदविण्यात आले. शनिवारी मात्र त्यात तब्बल पाच अंशांची घसरण झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला; परंतु खाली घसरलेले कमाल तापमान पुन्हा वरचढ होण्याची शक्यता अधिक असल्याने यंदाचा उन्हाळा मुंबईकरांसाठी तापदायक ठरणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३२.८ एवढे नोंदविण्यात आले. मात्र, त्यापूर्वी सलग तीन ते चार दिवस ते ३७ अंशांवर हाेते. सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत पडणारे ऊन मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत हाेते. शनिवारी मात्र उन्हाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी उकाडा कायम होता.
राज्याचा विचार करता विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे कमाल तापमानाचा तडाखा कायम आहे. शनिवारी राज्यभरात नोंद झालेल्या कमाल तापमानानुसार, नांदेड, सातारा, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगली, परभणी येथील कमाल तापमानाची नोंद ३६ अंशांच्या पुढे झाली असून, उकाड्यामुळे नागरिकांचा घाम निघत आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
..........................