मुंबईचे कमाल तापमान ३३.३ अंशांवर
By admin | Published: October 16, 2016 02:34 AM2016-10-16T02:34:34+5:302016-10-16T12:53:14+5:30
मान्सूनने मुंबईतून माघार घेतल्यानंतर आॅक्टोबर हीटचा तडाखा वाढू लागला आहे. गुरुवारपासून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत असून, कमाल तापमान
मुंबई : मान्सूनने मुंबईतून माघार घेतल्यानंतर आॅक्टोबर हीटचा तडाखा वाढू लागला आहे. गुरुवारपासून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत असून, कमाल तापमान आता थेट ३३ अंशांवर पोहोचले आहे. शनिवारी शहराचे कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ होत आहे.
गुरुवारपासून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूनचा वेग आणखी वाढला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार नैर्ऋत्य मौसमी पाऊस बिहार, झारखंड, छत्तीसगढचा बहुतांश भाग, मराठवाड्याचा आणखी काही भाग, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि तेलंगणाचा काही भाग आणि विदर्भाच्या उर्वरित भागातून माघारी परतला आहे. येत्या ४८ तासांसाठी नैर्ऋत्य मौसमी पाऊस पूर्व भारताच्या उर्वरित भागासह ईशान्य भारताच्या बहुतांश भागातून परतण्यासाठी स्थिती अनुकूल आहे. मुंबईतून शुक्रवारी मान्सूनने माघार घेतली असून, आॅक्टोबर हीटचा पारा चढू लागला आहे. कमाल तापमान ३३ अंशांवर पोहोचले असून, रविवारसह सोमवारी शहर आणि उपनगरातील आकाश ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)