लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबईकरांनी उष्णतेची लाट अनुभवली. कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर दाखल झाला. परिणामी, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांचा घाम निघाला. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३२ अंशावर स्थिर राहिला असला तरीही सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत पडणारे ऊन तापदायक ठरत आहे.
गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर कोकण, गोव्याच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. ३ एप्रिल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे हवामान कोरडे राहील. विदर्भात मात्र उष्णतेची लाट येईल. मुंबईत सर्वसाधारण परिस्थिती राहील. कमाल तापमान ३२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.