Join us

मुंबईचा पारा ३४ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याला देण्यात आलेला अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे. २२, २३ आणि २४ मार्च रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याला देण्यात आलेला अवकाळी पावसाचा इशारा कायम आहे. २२, २३ आणि २४ मार्च रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाज आहे, तर मुंबईत कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांवर स्थिर असून, तप्त दुपार आणि उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.

आग्नेय मध्यप्रदेश व लगतच्या विदर्भावर असलेला चक्रिय चक्रवात आता आग्नेय मध्यप्रदेश व लगतच्या भागावर आहे. कर्नाटक किनारा ते मराठवाड्यापर्यंतचे उत्तर-दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक किनारा, गोवामार्गे उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे होते. मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या तुरळक भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.