मुंबई : बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईचे किमान तापमान ४ अंशांनी खाली घसरले आहे. येथील किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, बुधवारी मुंबईचे किमान तापमान २० अंश नोंदविण्यात आले होते.किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे मुंबईकरांची पहाट गारेगार झाली असून, बोरीवली येथे १४.४९, पवई येथे १४.९६ आणि गोरेगाव येथे १५ एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. किमान तापमानाचा हा टेÑंड कायम राहणार आहे. परिणामी मुंबई अधिकच थंड होणार आहे. राज्याचा विचार करता चंद्रपुरात ४७ आणि गोंदियात ५१ मिमी पावसाची नोंद झाली असून, राज्यातील शहरांचे किमान तापमान १० ते १५ अंशांच्या घरात नोंदविण्यात आले आहे.राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १०.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.>१० ते १३ जानेवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १० आणि ११ जानेवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, १७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई १६.४, पुणे १४.८, जळगाव १६.६, महाबळेश्वर १३, मालेगाव १२.४, नाशिक १०.२, सातारा १४.९, औरंगाबाद १३.९, परभणी १६.६, अकोला १५.२, बुलडाणा १२.६, ब्रह्मपुरी ११.८, गोंदिया १५.६, नागपूर १५.९, वाशिम १३.४.