मुंबईचा पारा घसरला, किमान तापमान १५ अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 06:38 AM2018-12-21T06:38:15+5:302018-12-21T06:38:39+5:30
विदर्भात आलेली थंडीची लाट कायम : राज्यात सर्वांत कमी तापमान अहमदनगरमध्ये
मुंबई : उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता राज्यात धडकली असून, या थंडीच्या लाटेचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. गुरुवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १५ अंश नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे विदर्भात आलेली थंडीची लाट २१ आणि २२ डिसेंबर रोजीही कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिल्याने गारठ्यात आणखी वाढ होणार आहे.
उत्तर भारताचा विचार करता येथील सर्वच राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. विशेषत: उत्तर-पश्चिम दिशेकडून वाहणारे शीत वारे गारठ्यात भर घालत आहेत. हिमालयावरून वाहणाऱ्या शीत वाºयामुळे किमान तापमानात दोन ते चार अंशांची घट होत आहे. उत्तर पश्चिम भारत आणि मध्य भारतातील सर्वच राज्ये गारठली असून, तीन ते चार दिवस गारठा कायम राहील. हिमालयाचा पश्चिम भाग, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ थंडीने गारठला असून, उत्तरोत्तर यात आणखी भर पडणार आहे.
राज्याचा विचार करता गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात
आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. तर २१ आणि २२ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईत मोसमातील सर्वात कमी तापमान
मुंबईचे किमान तापमान गुरुवारी १५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबईतील या मोसमातील आतापर्यंतचे हे नीचांकी तापमान आहे.
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई १५, रत्नागिरी १७.४, पणजी २०, पुणे ८.८, अहमदनगर ६.४, जळगाव ९, कोल्हापूर १४.९, महाबळेश्वर ११, मालेगाव ९.६, नाशिक ९.३, सांगली ११.५, सातारा १०.९, सोलापूर १३.३, उस्मानाबाद १०.२, औरंगाबाद ८, परभणी ९.९, नांदेड १०, अकोला १०.२, अमरावती १०.६, बुलडाणा १०.८, चंद्रपूर १०.२, गोंदिया ११, नागपूर ८.६, वर्धा १०.९, यवतमाळ ९.४