मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील थंडी कमी होत असून, वातावरणातल्या कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. सद्य:स्थितीमध्ये मुंबईचे कमाल तापमान ३२, ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असतानाच वातावरणातील चढउतारामुळे रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.६ अंश नोंदविण्यात आले आहे. कमाल तापमानाचा हा चालू मौसमातील आतापर्यंतचा उच्चांक असून, सोमवारसह मंगळवारीही मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. वाढते कमाल तापमान मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरणार आहे.राज्यात सर्वात कमी किमान तापमान सातारा येथे १५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, तर सोमवार, मंगळवारी मुंबईचे कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३७, २२ अंशांच्या आसपास राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.मागील तीन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमानाचा पारा वाढत असतानाच भरदुपारी वाहणारे वारे ‘ताप’दायक वातावरणात भर घालत आहेत. त्यात सूर्याची प्रखर किरणे मुंबईकरांवर आग ओकत असून, तप्त वातावरण मुंबईकरांच्या त्रासात भरच घालत असल्याचे चित्र आहे.
मुंबईचा पारा पोहोचला ३७ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:36 AM