मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर मेट्रो रेलची कामे सुरू आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मुंबई शहरात मेट्रो-३ या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पश्चिम उपनगरात मेट्रो-२ आणि पूर्व उपनगरातमेट्रो-४ चे काम सुरू आहे. मेट्रोची कामे सुरु असताना ठिकठिकाणी कंत्राटदारांकडून बॅरिकेटस उभारण्यात आले आहेत. परिणामी रस्ते अरुंद झाले आहेत. याचा परिणाम म्हणून वाहतूक कोंडीत भर पडत असून, ही कोंडी फोडण्यासाठी प्राधिकरणाने उपाय योजावा, अशी मागणी नगरसेवक महापालिकेच्या महासभेत वारंवार करत आहेत.लाल बहादूर शास्त्री मार्गावर विक्रोळी येथे मेट्रो-४ चे काम सुरू आहे. येथे रस्त्याच्या बाजूला असलेला नाला आणि फुटपाथचे कामही सुरूआहे. येथील विकास कामास विरोध नाही. हे काम सुरू असताना मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी कंत्राटदाराने घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी पीलरचे काम करायचे आहे, त्याच ठिकाणी बॅरिकेट्स लावणे आवश्यक आहे. तरीही संपूर्ण रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. परिणामी, मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एलबीएस मार्गाला जोडून अग्निशमन केंद्र आहे. येथील वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेता, अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी पोहोचणे शक्य नाही. परिणामी, प्रशासनाने या विषयाकडे लक्ष देत,कंत्राटदारास नियमाप्रमाणे काम करण्याचे आणि नागरिकांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे, असे आमचे म्हणणे असल्याचेराष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योती हारून खान यांनी सांगितले. याला अनेक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. केवळ मेट्रो-४ नाही, तर पश्चिम द्रुतगती मार्गासह मुंबई शहरातही उन्नत व भुयारी मेट्रोचे काम सुरू आहे. येथील विकास कामांस विरोध नसून, काम करताना स्थानिकांसह नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, याकडे स्थानिक लक्ष वेधत आहे. महत्त्वाचे म्हणजे, मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणच्या कोंडीत भर पडत असून, ही कोंडी सोडविण्याकडेही लक्ष द्यावे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुंबईची मेट्रोकोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 5:16 AM