मुंबई : मुंबईत गेल्या पाच वर्षांत मृत्युदरांत २४ टक्क्यांनी वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईत २०२० मध्ये १.१ लाख, तर २०१९ मध्ये ९१ हजार २२३ मृत्यूंची नोंद झाली, हे प्रमाण २३ टक्के आहे. २०१८ साली ८८ हजार ८५२ मृत्यू झाले असून याचे प्रमाण २६ टक्के आहे. मागील वर्षभरातील मृत्यूंपैकी १० टक्के बळी कोरोनामुळे गेले असून ५४ टक्के मृत्यू अन्य कारणांमुळे ओढावले आहेत.
नाॅन कोविड रुग्णांच्या मृत्यूमागे वेळेवर उपचार न मिळणे, घरीच मृत्यू येणे किंवा कोविडमुळे मृत्यू होऊनही निदान न होणे अशी विविध कारणे असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मागील मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली असली तरी मे महिन्यात मृत्युदर अधिक वाढत गेल्याचे दिसून आले. मागील वर्षात मे महिन्यात सर्वाधिक बळी गेले असून त्याची संख्या १४ हजार ३२८ इतकी आहे, हे प्रमाण २०१९ मध्ये ७ हजार ३३५ आणि २०१८ मध्ये ७ हजार ४०७ इतके होते. याविषयी, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, शहर, उपनगरातील मागील वर्षभरात ओढावलेल्या मृत्यूंचा विश्लेषणात्मक अभ्यास अजून सुरू असून त्यातून मृत्यूची नेमकी कारणे स्पष्ट होतील.
जन्मदर झाला कमी!मुंबईत जन्मदरातही तब्बल १९ टक्क्यांनी घट झाल्याची चिंताजनक बाब पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीतून समोर आली. २०१९ साली शहर, उपनगरात १.४८ लाख प्रसूती झाल्याची नोंद आहे. मात्र २०२०मध्ये यात घट होऊन हे प्रमाण १.२० लाखांवर आलेले दिसून आले. दरवर्षी दोन टक्क्यांनी जन्मदरात घट होत असल्याची बाब पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीतून समोर आली.