मुंबईची गोधडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:09 AM2018-05-20T01:09:15+5:302018-05-20T01:09:15+5:30

मुंबईची गोधडी वेड्यावाकड्या तुकड्यांनी बनलेली आहे. याउलट जगामध्ये काही शहरे चौकोनी, अष्टकोनी तुकड्यांची, काटकोनात छेद देणारे रस्त्यांची, मोजून-मापून, भूमितीय शिस्तीने बेतलेली आहेत.

Mumbai's Mound | मुंबईची गोधडी

मुंबईची गोधडी

Next

सुलक्षणा महाजन

मुंबईची गोधडी वेड्यावाकड्या तुकड्यांनी बनलेली आहे. याउलट जगामध्ये काही शहरे चौकोनी, अष्टकोनी तुकड्यांची, काटकोनात छेद देणारे रस्त्यांची, मोजून-मापून, भूमितीय शिस्तीने बेतलेली आहेत. न्यू यॉर्क शहर काटेकोर, जमिनीचे आयताकृती तुकडे पाडून, नियोजन करून बेतलेले महानगर आहे. याउलट मुंबईमध्ये काही काही लहान विभाग, उदाहरणार्थ पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी असे शिस्तीमध्ये बांधलेले आहेत. पारसी कॉलनीमध्ये पाच उद्याने गोलाकाराची आहेत. जुन्या मुंबई बेटावरही काही ठिकाणी ब्रिटिश शिस्त तर काही ठिकाणी भारतीय बेशिस्त दिसते. लांबून बघता प्रत्येक शहराची गोधडी छानच दिसते; पण दिसणे हा काही शहराच्या गोधडीचा महत्त्वाचा गुण नाही. लोकांना ऊब देणे, आश्वासक आधार देणे, पांघरुणाखाली मानवी संस्कृती जपणे हे शहरांचे खरे काम.

मुंबईमध्ये पहिल्यांदा आल्यावर काय जाणवले असेल, तर ते म्हणजे मुंबईची विविधता आणि चैतन्य. मरीन ड्राइव्हचा ऐसपैस, सुंदर, समुद्राची गाज असलेला पसारा, जिमखाने, मैदाने त्या पाठीमागे दाट, लोक वर्दळ आणि गोंगाट असलेले गिरगाव. प्रत्येक विभागाचे भौगोलिक स्वरूप वेगळे. त्यांच्या जन्माच्या आणि नावांच्या कथा वेगळ्या. मुंबईच्या पसाऱ्यात मिळून-मिसळून जाण्याचा काळ वेगळा, इतिहास वेगळा, राहणारे लोकसमूह आणि त्यांची संस्कृतीही वेगळी. मुंबई बेट हे आधुनिक मुंबईच्या जन्माचे गाव. उपनगरे ही पाठोपाठची भावंडे. त्यापुढे रेल्वेला लटकत वाढत गेलेली ठाणे, कल्याण, वसई ही सगळी आते-मामे गावे. उल्हासनगर आणि नवी मुंबई ही सर्वात धाकटी भावंडे.
जे.जे. कला महाविद्यालयाचा परिसर दक्षिण मुंबईत असला तरी सी.एस.एम.टी. आणि चर्चगेट स्टेशनच्या सानिध्यामुळे दूरवरून येणारे विद्याथीर्ही पुष्कळ. मुलामुलींचे गट सुरुवातीला या भूगोलाशी नाते राखून असत. कुलाबा, मलबार हिल येथील मुले-मुली उच्चभ्रू, इंग्रजी माध्यमात शिकलेली, तर दादर, गिरगाव, पार्ले येथील मराठी माध्यमात शिकलेली. त्याहून पलीकडे राहणारी लाजरी-बुजरी आणि माझ्यासारखी बाहेर गावाहून आलेली परकी; पण दोन-तीन वर्षांत सर्वच मुंबईकर होत.
सायन आणि वांद्रे पलीकडील विभाग १९५१ नंतर मुंबईमध्ये अधिकृतपणे सामील झाले. तेव्हा मुंबई बेट, पूर्व आणि पश्चिम उपनगरे मिळून बृहन्मुंबई बनली. त्यांच्यातील भौगोलिक दुरावा प्रशासनाने दूर केला; पण सामाजिक-सांस्कृतिक गुणसूत्रे प्रत्येकाची ठसठशीत झाली. मुंबई समजून घेताना प्रत्येक विभाग लक्षात घ्यावा लागतो.
मुंबईचा नियोजन नकाशा बघितला की, ठिगळे जोडून केलेल्या गोधडीची आठवण होते. निवासी विभाग पिवळे, व्यापारी निळे, औद्योगिक विभाग जांभळे तर मोकळ्या जमिनीचे तुकडे हिरव्या रंगाचे. हे
सर्व तुकडे जाड-बारीक काळ्या रेघांच्या रस्त्यांनी जोडलेले असले तरी वेगळेही ओळखू येतात. तुकडे जोडून केलेली प्रत्येक गोधडी जशी
वेगळी दिसते, तसेच मुंबईचे स्वरूप असते. वेडेवाकडे, उरले-सुरले रंग-बेरंगी कापडांचे तुकडे जमतील तसे जोडून केलेल्या मुक्त-बेशिस्त असतात. तर काही डिझायनर गोधड्या मात्र कापडाचे रंग, आकार, पोत यांचा बारकाईने विचार करून, कापून-जोडून भूमिती चित्रासारख्या शिस्तीत बनवलेल्या असतात. गोधड्या जरी अशा दोन प्रकारे केलेल्या असल्या, तरी जर त्या मऊ मुलायम, उबदार असतात, तेव्हाच त्या सुंदरही दिसतातच शिवाय प्रेम आणि सुखही देतात. असेच गुण शहरात असले तर शहर आपले वाटते.
मुंबईची गोधडी वेड्यावाकड्या तुकड्यांनी बनलेली आहे. या उलट जगामध्ये काही शहरे चौकोनी, अष्टकोनी तुकड्यांची, काटकोनात छेद देणारे रस्त्यांची, मोजून-मापून, भूमितीय शिस्तीने बेतलेली आहेत. न्यूयॉर्क शहर काटेकोर, जमिनीचे आयताकृती तुकडे पाडून, नियोजन करून बेतलेले महानगर आहे. या उलट मुंबईमध्ये काही काही लहान विभाग, उदाहरणार्थ पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी असे शिस्तीमध्ये बांधलेले आहेत. पारसी कॉलनीमध्ये पाच उद्याने गोलाकाराची आहेत.
जुन्या मुंबई बेटावरही काही ठिकाणी ब्रिटिश शिस्त तर काही ठिकाणी भारतीय बेशिस्त दिसते. लांबून बघता प्रत्येक शहराची गोधडी छानच दिसते; पण दिसणे हा काही शहराच्या गोधडीचा महत्त्वाचा गुण नाही. लोकांना उब देणे, आश्वासक आधार देणे, पांघरूणाखाली मानवी संस्कृती जपणे हे शहरांचे खरे काम. जंगलातल्या असुरक्षित वातावरणातून बाहेर पडणाºया, धडपडत शहरात आलेला मानव गेली दहा हजार
वर्षे हाच प्रयत्न करतो आहे. जे शहर लोकांना जपते त्याच शहराला लोकही जपतात. नगरशास्त्राचा तो नियमच आहे. त्यासाठी शहरावर आईसारखे प्रेम असावे लागते आणि आईसारखाच शिस्तीचा धाकही असावा लागतो. साठच्या दशकात मी मुंबईत आले, तेव्हा बहुविध समाजांनी बनलेली मुंबईची गोधडी अशीच उबदार होती. नंतर मात्र हळूहळू शिवण उसवत गेली. मुंबईचे लचके तोडणारे हक्काचे दावेदार वाढत गेले. मुंबईत येणारे आणि काही पिढ्या राहणारे नागरिकही आता नाईलाजाने येथे राहत आहेत. प्रेम संपलेल्या शहराची गोधडी टोचते, खुपते आणि दु:सह्य होते, हळूहळू विरून जात नष्टही होऊ शकते. मुंबई विरून जायला नको असेल तर आता गोधडीला प्रेमाने शिवणारे कुशल हात शोधायला हवेत. तसे झाले तरच पुन्हा एकदा मुंबईची उबदार गोधडी बनेल.

Web Title: Mumbai's Mound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.