मुंबईच्या वाटेला ठेंगा ‘नवीन काहीही नाही’
By admin | Published: February 25, 2016 04:11 PM2016-02-25T16:11:19+5:302016-02-25T16:24:12+5:30
महाराष्ट्रातील मराठी मंत्री रेल्वेला लाभल्यामुळे मुंबईला सुरेश प्रभू यांच्याकडून मोठ्या आशा होत्या. तथापि, या सगळ्या आशा फोल ठरल्याच्या प्रतिक्रिया मुंबईकरांनी व्यक्त केल्या.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - महाराष्ट्रातील मराठी मंत्री रेल्वेला लाभल्यामुळे मुंबईला सुरेश प्रभू यांच्याकडून मोठ्या आशा होत्या. तथापि, या सगळ्या आशा फोल ठरल्याच्या प्रतिक्रिया मुंबईकरांनी व्यक्त केल्या. मुंबईच्या वाटेला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात काहीही खास आलेले नसल्याने सामान्य मुंबईकर निराश झाले आहेत. कधी तरी आपल्याला मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करताना मोकळा श्वास घेता येईल, अशी आशा मुंबईकर बाळगून होते. पण यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
मुंबईच्या वाटेला दोन एलिवेटेड प्रकल्प आलेत पण ते काही वर्षांपूर्वीच जाहीर झालेले आहेत. तथापि, त्या दिशेने अजूनपर्यंत म्हणावी तशी कार्यवाही झालेली दिसत नसल्याचे विलेपार्ले येथील रहिवासी धनंजय कुंवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आधीच्या सरकारने आणलेले चांगले प्रकल्प नव्या सरकारने जरुर पूर्ण करावेत, पण जे प्रश्न त्यांना विरोधक असताना माहित होते, त्याचे प्रतिबिंब कुठेही रेल्वे अर्थसंकल्पात दिसून येत नाही, असेही ते म्हणाले.
पवईतील रहिवासी संजय नलावडे यांच्या मते, मुंबईतील लोकलवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. तो कमी करण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न रेल्वे अर्थ संकल्पातून दिसून येत नाहीत. एलिवेटेड रेल्वे हा प्रकल्प जुनाच आहे. तो अंमलात येणे अत्यंत गरजेचे आहे. तथापि, सध्या अस्तित्त्वात असलेल्या लोकल सेवांमध्ये आणखी सुधारणा करणे गरजेचे होते, त्याबाबत फार काही सुरेश प्रभू यांनी केल्याचे दिसून येत नाही. वास्तविक मराठी असल्याने तसेच कोकणची पार्श्वभूमी असल्याने मुंबईचे प्रश्न त्यांना चांगले ठाऊक आहेत, पण त्याचे प्रतिबिंब मात्र दिसून येत नाही.
भांडुपमधील रहिवासी आशा पाटील यांच्या मते, महिला प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुखकर होईल, अशी खात्री आम्हाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून होती. पण असे काहीही घडलेले नाही. लोकलमध्ये महिलांचे डबे वाढविणे, महिला जादा लोकल सोडणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांना समान अधिकार एकीकडे म्हणायचे प्रवासात मात्र त्यांचा कोंडमारा करायचा, हे कुठवर खपवून घेणार, असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
कल्याणच्या महिला प्रवासी रश्मी देशपांडे यांनी तर रेल्वे मंत्र्यांकडून घोर निराशा झाल्याचे म्हटले. एलिवेटेड प्रकल्प चांगला आहे. कैक वर्षांपासून याची चर्चा आहे. पुन्हा त्याला रेल्वे अर्थसंकल्पात स्थान मिळाले. सीएसटी-कल्याण एलिवेटेड मार्गाचीही चर्चा मागे झाली होती. पण यंदा तर हा मार्गच रेल्वे अर्थसंकल्पातून गायब झाला आहे. म्हणजे मध्य रेल्वेवर याआधीही सुरु असलेला अन्याय यापुढेही आम्ही खपवून घ्यायचा का? सत्ताधारी पक्षातील मुंबईतील खासदार याप्रश्नी आवाज उठवतील का? की केवळ मत मागताना आमच्याकडे येणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.