Join us

राज्यात मुंबईचा नववा नंबर; बारावीत यंदा सर्वात कमी ८८.१३ टक्के निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 6:16 AM

राज्यात कोकण विभागीय मंडळाने यंदा ९६.१ टक्के निकालाची टक्केवारी गाठत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला असला, तरी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. मुंबई विभागीय मंडळाचा ८८.१३ टक्के निकाल लागला आहे; तर सालाबादप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाच्या निकालाची टक्केवारी ९६.१ टक्के एवढी आहे. गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयांत मिळणार आहे. 

राज्यात कोकण विभागीय मंडळाने यंदा ९६.१ टक्के निकालाची टक्केवारी गाठत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मुंबई विभाग नवव्या स्थानावर पोहोचला आहे. विद्यार्थ्यांना २६ मे ते ५ जून या कालावधीत गुणपडताळणीसाठी अर्ज करता येतील. उत्तर पत्रिकांच्या झेरॉक्स कॉपीसाठी २६ मे ते १४ जून या कालावधीत महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. 

१ लाख ४३ हजार ८९५ मुली उत्तीर्ण nमुंबई विभागीय मंडळात एकूण ३ लाख ३१ हजार १६१ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती, त्यात ३ लाख २९ हजार ३३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातून २ लाख ९० हजार २५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

nमुंबई विभागातील निकालात एकूण १ लाख ८१ हजार ६८५ मुले आणि १ लाख ६२ हजार ६८१ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यातील १ लाख ५१ हजार ९८९ मुले आणि १ लाख ४३ हजार ८९५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यात मुलांचे प्रमाण ८४.१९ टक्के असून, मुलींचे प्रमाण ८८.९० टक्के आहे. 

टॅग्स :बारावी निकाल