Join us

मुंबईतील 'हे' पॉश रुग्णालय करतेय आर्थिक तंगीचा सामना, 50 डॉक्टर्सना मागच्या सहा महिन्यांपासून नाही मिळाले वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 12:08 PM

मुख्य डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केल्यामुळे 50 ज्युनिर डॉक्टर्स आता आरोग्य सेवेची जबाबदारी संभाळत आहेत.

ठळक मुद्दे306 बेडचे सेव्हनहिल्स हॉस्पिटल मागच्या काही काळापासून आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. मागच्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या वेतनासंबंधी व्यवस्थापनासोबत अनेक बैठका झाल्या.

मुंबई - अंधेरीतील मरोळ येथील प्रसिद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील 50 डॉक्टर्सना मागच्या सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या डॉक्टरांनी अखेर पोलीस स्टेशन गाठले असून वेतन रोखून धरणा-या व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजीनामा देण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जातोय असे या डॉक्टर्सनी सांगितले. मागच्यावर्षीच्या जुलै महिन्यापासून या डॉक्टरांना वेतन मिळालेले नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

28 डिसेंबरपासून अनिश्चितकाळासाठी हे डॉक्टर्स संपावर गेले आहेत. मुख्य डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केल्यामुळे 50 ज्युनिर डॉक्टर्स आता आरोग्य सेवेची जबाबदारी संभाळत आहेत. फक्त इर्मजन्सी वॉर्डमधील रुग्णांना तपासण्याचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे. 306 बेडचे सेव्हनहिल्स हॉस्पिटल मागच्या काही काळापासून आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. सध्या इथे रुग्ण संख्या घटली आहे. 

मागच्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या वेतनासंबंधी व्यवस्थापनासोबत अनेक बैठका झाल्या. प्रत्येकवेळी आम्हाला आमचे वेतन बँक खात्यात जमा होईल असे खोटे आश्वासन देण्यात आले. पण कधीही शब्द पाळला नाही. रुग्णालयाकडून राजीनामा देण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात झाल्यानंतर या डॉक्टरांनी एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. आम्हाला सुद्धा कुटुंब आहे. सहा महिन्यांपासून वेतन नाही मिळाले तर कुटुंब कसे चालवायचे ? मागच्या तीन महिन्यांपासून मी माझ्या मुलांच्या शाळेची फि सुद्धा भरु शकलेलो नाही असे एका सिनियर डॉक्टरने सांगितले. 

टॅग्स :आरोग्य