मुंबईतील जुन्या डबलडेकर बस होणार हद्दपार; नैसर्गिकऐवजी एसीचा घ्या गार वारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:31 AM2023-05-04T11:31:33+5:302023-05-04T11:31:50+5:30
डबलडेकर बसमधून एकदा तरी प्रवास करायचा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आवडत्या डबलडेकर बसमधून फिरण्याचा चिमुकल्यांचा तर हट्टच असतो
मुंबई - मुंबईच्या रस्त्यांवरून डौलाने धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील डबलडेकर बस लवकरच मुंबईच्या रस्त्यांवरून हद्दपार होणार आहेत. डबलडेकर बसची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने बेस्टने ४५ पैकी ४० बस आपल्या ताफ्यातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे, तर उर्वरित ५ बस एप्रिल २०२४ पर्यंत हटविण्यात येणार आहेत.
डबलडेकर बसमधून एकदा तरी प्रवास करायचा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आवडत्या डबलडेकर बसमधून फिरण्याचा चिमुकल्यांचा तर हट्टच असतो. मुंबईच्या दक्षिण भागात विशेषतः डबलडेकर धावत असून या डबलडेकरमधून प्रवास करायचा या कुतूहलापोटी या बसला नेहमीच मुंबईकरांची गर्दी असते.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ४५ डबलडेकर बस असून या बस कालबाह्य झाल्या आहेत. या बसऐवजी एसी डबलडेकर बस ताफ्यात उतरवण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्या २ एसी डबलडेकर बस आहेत. जुन्या डबलडेकर बसना १५ वर्षे पूर्ण झाल्याने त्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या दुमजली बसला ८५ वर्षे पूर्ण झाली. बेस्टच्या ताफ्यात सध्या ४५ डबलडेकर बस असून ओपन डेक असलेल्या ५ बस आहेत.