Join us

मुंबईतील ओव्हल मैदान शुक्रवारपासून १५ दिवस बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 9:13 PM

फोर्ट येथील विविध खेळांसाठी प्रसिध्द असलेल्या ओव्हल मैदानावर दररोज खेळाडूंची गर्दी होत असते. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने शुक्रवारी २६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी हे मैदान बंद ठेवण्यात येणार

मुंबई - फोर्ट येथील विविध खेळांसाठी प्रसिध्द असलेल्या ओव्हल मैदानावर दररोज खेळाडूंची गर्दी होत असते. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने शुक्रवारी २६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी हे मैदान बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आढावा घेतल्यानंतर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

गेल्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शासकीय व खाजगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती आणि लग्न समारंभ, हॉटेल, पब येथे ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. दरम्यान, दक्षिण मुंबईतील सर्वात मोठे मैदान असलेल्या ओव्हल मैदानातील गर्दी धोकादायक ठरत आहे. 

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने या मैदानात होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. मात्र खेळाचे मैदान असल्याने कोरोनाचे नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीपासून पुढील १५ दिवसांसाठी हे मैदान बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या सर्व सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन इतर मैदाने व सार्वजनिक ठिकाणचीही पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या