मुंबई : जगातील सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येत कोरोनाकाळात प्रचंड घट झाली. त्यामुळे व्यस्त विमानतळांच्या यादीत मुंबईचे स्थान घसरले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या यादीनुसार सध्या दिल्ली हे देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ असून, त्याखालोखाल बंगळुरू आणि त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो.
एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत देशातील विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास केलेल्या प्रवाशांची आकडेवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच जाहीर केली. त्यानुसार या काळात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (मुंबई) ७६ लाख ९४ हजार २४ प्रवाशांनी प्रवास केला. तर दिल्ली १ कोटी ५९ लाख ५२ हजार ९५५ आणि बंगळुरू विमानतळावरून ७९ लाख ८ हजार ५६७ प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येत जवळपास ८०.६० टक्के, बंगळुरू ७१.९० आणि दिल्ली विमानतळावरील प्रवासी संख्येत ७२.४० टक्के घट झाली. या यादीत पुणे विमानतळाचे स्थानही घसरले. व्यस्त विमानतळांच्या नव्या यादीनुसार पुण्याचे स्थान १०वे आहे. या विमानतळावरून एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या काळात १६ लाख ७८१ प्रवाशांनी प्रवास केला. .
कारण काय?देशाचा विचार करता सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळली. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी लागली. सक्तीचे विलगीकरण, लॉकडाऊन काळात वाहतुकीची गैरसोय, हॉटेल आणि उपाहारगृहांवर असलेले निर्बंध यामुळे मुंबईत उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. विमान प्रवासात कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याची भावना सुरुवातीच्या काळात निर्माण झाल्याने देशभरात विमान प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले.