मुंबईच्या प्रदूषणाने गाठली दिल्ली; २०० मीटरच्या पलीकडे काेणाला काही दिसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 06:36 AM2022-12-07T06:36:43+5:302022-12-07T06:37:08+5:30

गाड्यांना कासवाचे पाय, मुंबई धूलिकणांमुळे प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. कुर्ला, वरळीसह लगतच्या परिसरात धूलीकण वातावरणात पसरले आहेत.

Mumbai's pollution reaches Delhi; No one could see anything beyond 200 meters | मुंबईच्या प्रदूषणाने गाठली दिल्ली; २०० मीटरच्या पलीकडे काेणाला काही दिसेना

मुंबईच्या प्रदूषणाने गाठली दिल्ली; २०० मीटरच्या पलीकडे काेणाला काही दिसेना

googlenewsNext

मुंबई : किमान तापमानात होत असलेली घसरण, कमी झालेला वाऱ्याचा वेग, बाष्पामध्ये मिसळत असलेले धूलिकण आणि प्रदूषण या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे. मंगळवारी तर मुंबईची हवा दिल्लीएवढीच अत्यंत खराब नोंदविण्यात आली असून, थंडी संपेपर्यंत मुंबईमधील प्रदूषण या कारणामुळे असेच कायम राहील, अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही दिवस आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ काय म्हणते?

मुंबई धूलिकणांमुळे प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. कुर्ला, वरळीसह लगतच्या परिसरात धूलीकण वातावरणात पसरले आहेत. आता हवेचा वेग कमी आहे. त्यामुळे प्रदूषके म्हणजे धूलीकण हवेतून वाहून जात नाहीत. हिवाळ्यात धूलिकण जास्त वर जात नाहीत. ते जमिनीवर राहतात. त्यामुळे प्रदूषण वाढते आहे. मुंबई विकासाच्या टप्प्यावर आहे. विविध कामे सुरू आहेत. इमारतींची बांधकामे सुरू आहे. यातून उठणारे धूलिकण वातावरणात मिसळत आहेत. - डॉ. व्ही. एम. मोटघरे, सहसंचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

आरोग्यावर काय परिणाम होत आहे?
धूलिकणांचा आरोग्यावर थोडाफार परिणाम होतो. मात्र एवढी धोकादायक स्थिती नाही. दिल्लीसारखी स्थिती मुंबईत नाही. कारण दिल्ली अतिथंड प्रदेश आहे. मुंबई तेवढी थंड नसल्याने आपण त्यावर उपाययोजना करत आहोत. आता जसजशी हवेची गती वाढेल तसे हे प्रदूषण कमी होईल. किमान दोन ते तीन दिवस हे प्रदूषण कायम राहणार आहे. मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या आयुक्तांना राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यकमांतर्गत उपाय योजावे, असे सांगण्यात आले आहे. मागच्या आठवड्यात तशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
पत्र पाठविण्यात आले आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. व्ही. एम. मोटघरे यांनी सांगितले.

दम्याच्या रुग्णांचा त्रास बळावला
मागील काही दिवसांत सातत्याने बदलत्या वातावरणामुळे दमा असणाऱ्या रुग्णांचा त्रास बळावत आहे. त्यामुळे यातील ज्येष्ठ व आजारी लाेकांना थेट  रुग्णालय गाठावे लागत आहे. एरवी दमा असणारे रुग्ण महिन्या-दोन महिन्यांच्या अंतराने फाॅलोअपसाठी येतात. मात्र मागील काही दिवसांत हे प्रमाण वाढले असून सध्या या रुग्णांनी विभाग भरला आहे. या वातावरणात सामान्यांनी म्हणजेच श्वसनविकार नसणाऱ्यांनी मास्क घालण्याची गरज आहे. - डॉ. प्रीती मेश्राम, श्वसनविकारतज्ज्ञ, जे. जे. रुग्णालय

२०२५ पर्यंत हवेतील धूलीकण २० ते २५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आराखडा केला आहे. वाहनांचे प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. रस्त्यावरची धूळ कमी व्हावी म्हणून स्वीपिंग मशीन घेण्यात आल्या आहेत. हरित पट्टा तयार केला जाणार आहे. ४२ मुद्दे असलेला कृती आराखडा तयार झाला आहे. त्यानुसार आता त्याची अंमलबजावणी होत आहे.

प्रदूषण कोणत्या घटकांमुळे वाढते?
सूक्ष्म धूलिकण 
सल्फर डायऑक्साईड 
नायट्रोजन डायऑक्साईड 
कार्बन डायऑक्साईड 
कार्बन मोनोऑक्साईड

Web Title: Mumbai's pollution reaches Delhi; No one could see anything beyond 200 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.