मुंबई : काही दिवसांपूर्वी वेगाने वाढत असलेली मुंबईतील रुग्णसंख्या मागील ४-५ दिवसांत कमी झाली आहे. शहर-उपनगरात शुक्रवारी ७७ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. मागील काही दिवसांतील मुंबईची रुग्णसंख्या पाहता यात ५० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असून रुग्णसंख्या मात्र कमी होतेय, ही मुंबईसह राज्यातील सामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मुंबईची एकूण रुग्णसंख्या २,१८५ झाली असून बळींचा आकडा १२२ झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी घरोघरी चाचण्या सुरू केल्या. शिवाय मृत्यूंचे विश्लेषण करून ही संख्या कमी करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती केली आहे. यावर गतिशील काम सुरू केल्यामुळे शहरातील रुग्णसंख्या घटल्याचे प्रामुख्याने कारण दिसून येत आहे. मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांपैकी १ हजार १५८ कोरोना रुग्ण सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना आणि कोविड संशयित रुग्णांचा शोध याअंतर्गत सापडले आहेत. तर १४ एप्रिलपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३८ हजार ९९० इमारतींच्या आवारात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.मुंबई महानगरपालिकेने सात ठिकाणी एकूण ५१९ खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. १७ एप्रिलपर्यंत एकूण ४७३ कोरोना (कोविड-१९) रुग्णांना या ठिकाणी भरती करण्यात आले आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व कमी जोखमीच्या संशयितांचे १४ दिवसांकरिता घरी अलगीकरण करण्यात येते. शहर-उपनगरातील एकूण ५७ हजार ७००व्यक्तींचे गृह अलगीकरण करण्यात आले. त्यापैकी ११ हजार ३६८ व्यक्तींनी गुरुवारी १६ एप्रिल रोजी १४ दिवसांचा अलगीकरण काळ पूर्ण केला आहे.४,४५३ जणांचे सर्वेक्षण५ ते १६ एप्रिलदरम्यान सर्व प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत या ११५ क्लिनिकमध्ये ४ हजार ४५३ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १ हजार ७६१ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत.