मुंबई - सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82,000 एवढी आहे. यातच गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 33 दिवसांनंतर एका दिवसात एवढे रुग्ण समोर आले आहेत. याच वेळी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वेगाने वाढले असून मुंबईत आज तब्बल 4000 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्याअनुषंगाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
ओमायक्रॉन आणि वाढती कोरोना पॉझिटीव्ही रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. ''मुंबईत काल 2200 च्या दरम्यान रुग्ण आढळून आले होते, आज हीच रुग्णसंख्या 4 हजारांच्याजवळ पोहोचली आहे. मुंबईत एका दिवशीची आजची पॉझिटीव्हीटी 8.48 एवढी आहे. ठाण्याची 5.25, रायगड 4, पुण्याची 4.14 याचा अर्थ असा आहे की, 100 टेस्टमागे 5 ते 8 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. आजची परिस्थिती नक्कीच चिंता वाढवणारा विषय आहे. टास्क फोर्स आणि इतरांनी जी चर्चा केली. त्यानुसार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात घेणार आहेत. आज किंवा उद्या याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील,'' असे राजेश टोपे यांनी सांगितले.
गर्दी टाळलीच पाहिजे, गर्दी नकोच हाच एक सूर आहे. गर्दीमुळे संक्रमण वाढेल, असेच सर्वांचे मत आहे. गर्दी टाळण्यासंदर्भातच निर्णय होऊ शकेल, असेही टोपे यांनी सांगितले. टेस्टींग संदर्भात एचडीटीएफ कीटचा वापर करण्याचे ठरले आहे. लसीकरणाबाबतही निर्णय घेण्यात आला असून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी, शाळा किंवा कॉलेज बंद न करता विशेष मोहिमेतून त्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
लव अग्रवाल काय म्हणतात
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, देशातील 8 जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर 10% पेक्षा जास्त आहे. याच वेळी, 14 जिल्हे असे आहेत जेथे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5-10% एवढा आहे. महाराष्ट्रात 9 डिसेंबरला पॉझिटिव्हिटी रेट 0.76% एवढा होता, तो आता 2.3% झाला आहे. याचप्रमाणे, बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 1.61% होता, तो वाढून 3.1% झाला आहे. तसेच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 0.1% होता, तो आता 1% झाला आहे.