Join us  

मुंबईत मान्सूनपूर्व कामांना वेग

By admin | Published: May 09, 2016 2:41 AM

मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाने तासभर धुमाकूळ घातला, तरी भायखळा, दादर, परळसह उर्वरित भागातील रस्ते पाण्याखाली जातात.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाने तासभर धुमाकूळ घातला, तरी भायखळा, दादर, परळसह उर्वरित भागातील रस्ते पाण्याखाली जातात. परिणामी, मुंबईतल्या वाहतुकीचा बोजवारा उडतो आणि नागरिकांना वाहतूककोंडीसह कंबरेएवढ्या साचलेल्या पाण्यातून वाट काढत कार्यालय अथवा घर गाठावे लागते. मात्र, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी महापालिकेने पम्पिंग स्टेशनचे काम वेगाने हाती घेतले आहे. पर्जन्यजल वाहिन्यांच्या साफसफाईच्या कामालाही वेग दिला आहे. त्यामुळे वेळेत सुरू झालेल्या या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबई, विशेषत: मध्य मुंबई तुंबणार नाही आणि मुंबईकरांना मनस्ताप होणार नाही, असा दावा महापालिकेने केला आहे.मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागांतर्गत येणाऱ्या दीपक चित्रपटगृहाजवळील गावडे चौक परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७०० मिमी व्यासाची पर्जन्यजल वाहिनी आहे. ही वाहिनी गाळ साचत गेल्यामुळे बंद झाली होती. या पर्जन्यजल वाहिनीत साचलेला गाळ काढून, ती पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. यासोबतच या वाहिनीच्या बाजूला ६०० मिमी व्यासाची एक अतिरिक्त पर्जन्यजल वाहिनी बसविण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात गावडे चौक, ना. म. जोशी, सेनापती बापट मार्ग या परिसरातील पावसाच्या पाण्याचा लवकर निचरा होण्यास मदत होणार आहे.मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारणे, पर्जन्यजल वाहिन्या बसविणे, ही कामे महापालिकेच्या पर्जन्यजल वाहिन्या या खात्याद्वारे प्राधान्याने केली जातात. या अंतर्गत गावडे चौकात यापूर्वीच बसविण्यात आलेल्या ७०० मिमी व्यासाच्या ३० मीटर लांबीच्या पर्जन्यजल वाहिनीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे ती बंद झाली होती. या पर्जन्यजल वाहिनीत साचलेला गाळ आता काढण्यात आला आहे. परिणामी, आता ही वाहिनी पुन्हा कार्यान्वित झाली आहे. या वाहिनीची पर्जन्यजल निस्सारण करण्याची अधिकतम क्षमता ही दर सेकंदाला ५३० लीटर (०.५३ क्युबिक मीटर) इतकी आहे. त्याचबरोबर, याच वाहिनीच्या बाजूला ६०० मिमी व्यासाची व ३० मीटर लांबीची एक अतिरिक्त पर्जन्यजल वाहिनी बसविण्याचे कामदेखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. या अतिरिक्त वाहिनीची पर्जन्यजल निस्सारण करण्याची कमाल क्षमता ही दर सेकंदला ३४० लीटर (०.३४ क्युबिक मीटर) असणार आहे.गावडे चौकात कार्यान्वित करण्यात येत असलेल्या दोन्ही पर्जन्यजल वाहिन्या अंतिमत: डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावरील ‘लव्ह ग्रोव्ह पम्पिंग स्टेशन’शी संबंधित आहेत. या दोन्ही पर्जन्यजल वाहिन्यांमुळे येत्या पावसाळ्यात गावडे चौक, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पर्जन्यजल वाहिन्यांबाबत कार्यवाही सुरू असताना वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. ही कार्यवाही रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीतच करण्यात येत आहे.