मुंबईचे ‘पुनश्च हरिओम’ महापालिकेसाठी डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:01 AM2020-06-09T01:01:36+5:302020-06-09T01:01:45+5:30
कोरोना रोखण्याचे आव्हान : पावसाळी आजारांसाठी नियोजन करण्यासाठीही प्रयत्न
मुंबई : ‘पुनश्च हरिओम’च्या तिसऱ्या टप्प्यात सोमवारपासून मुंबईतील खासगी कार्यालये दहा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरू झाली आहेत. मात्र या प्रयोगाच्या पहिल्याच दिवशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आणि लोकांची गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याचे संकट असल्याने महापालिका प्रशासनासमोर दुहेरी आव्हान आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘पुनश्च हरिओम’च्या पहिल्या टप्प्यात ३ जूनपासून मुंबईकरांना घराबाहेर फेरफटका, जॉगिंग, उद्यानात फिरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर दुसºया टप्प्यात ५ जून रोजी सम-विषम पद्धतीने मंडई व दुकाने सुरू करण्यात आली. तर सोमवारपासून खासगी कार्यालये सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे. मात्र मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, दहा टक्के कर्मचाºयांची उपस्थिती, सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
मात्र खासगी कार्यालये सुरू झाल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून रुग्णालय व कोविड केअर सेंटर सज्ज ठेवली आहेत.
त्याचबरोबर विभाग स्तरावर पालिकेचे दवाखाने आणि खासगी दवाखान्यांच्या मदतीने लोकांची नियमित तपासणी सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच पावसाळी आजारांवरही तात्काळ उपचार मिळतील याची खबरदारी घेतली जाणार आहे.
कसा रोखणार संसर्ग...
खासगी कार्यालयात दहा टक्केच उपस्थिती आणि सुरक्षेची खबरदारी घेतली जाते का? याची झाडाझडती घेण्यासाठी विभाग स्तरावरील दुकाने व आस्थापना खात्याचे अधिकारी कार्यालयांमध्ये तपासणी करीत आहेत. नियम मोडणाºया कार्यालयांना नोटीस पाठविण्यात येत आहे. तसेच दुकानांची पाहणी करण्यासाठी विशेष पथक पाठविण्यात येते. नियम मोडणाºया दुकानांचे शटर बंद करण्यात येत आहे. मात्र मर्यादित कर्मचारी वर्ग आणि कामाचा ताण यामुळे सर्वच ठिकाणी पोहोचणे पालिका अधिकाºयांना शक्य होत नाही, असे एका सहायक आयुक्तांनी सांगितले.
मिनी बसचे रूपांतर
संडे क्लिनिकमध्ये
बेस्ट उपक्रमातील मिनी बसचा उपयोग संडे क्लिनिकच्या रूपाने होणार आहे. यासाठी दर रविवारी महापालिकेच्या २४ प्रशासकीय वॉर्डांमध्ये बेस्ट उपक्रमाच्या मिनी बसगाड्या रहिवाशांची आरोग्य तपासणी करणार आहेत. या बसमध्ये डॉक्टर आणि सहायक आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच स्थानिक नगरसेवक, आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
४८,५४९
आतापर्यंत रुग्णसंख्या
२१,०९०
डिस्चार्ज
२४,८५२
सध्या उपचार घेणारे
१,६३८
मृत्यू