मुंबईचा पाऊस ३ हजार मिमीचा टप्पा पार करतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:15 PM2020-08-27T18:15:18+5:302020-08-27T18:15:42+5:30
ऑगस्ट महिन्यात मान्सून पुरेपुर कोसळला आहे.
मुंबई : यंदा मान्सूनने दमदार एन्ट्री करत आपली खेळी ब-यापैकी कायम ठेवली आहे. जुन, जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात मान्सून पुरेपुर कोसळला आहे. ऑगस्ट महिना संपत असतानाच सांताक्रूझ येथे २ हजार ९४६.१ मिलीमीटर तर कुलाबा येथे २ हजार ६९९.४ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली असून, मुंबईकरांना झोडपणारा पाऊस ३ हजार मिलीमीटरचा टप्पा पार करत आहे.
मुंबई शहरात ६३ टक्के अधिक पाऊस पडला आहे. कारण १ जूनपासून आतापर्यंत मुंबईत शहरात १ हजार ६५९.५ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. यावेळी ही नोंद २ हजार ६९९.८ मिलीमीटर एवढी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के एवढा अधिक पाऊस पडला आहे. उपनगराचा विचार करता येथे देखील ६३ टक्के एवढया अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून मुंबईच्या उपनगरात १ हजार ८०८.४ मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. यावेळी ही नोंद २ हजार ९४६.१ मिलीमीटर एवढी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के एवढा अधिक पाऊस पडला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात ऑगस्ट महिन्यात दमदार बरसणा-या पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. विशेषत: श्रावण महिना संपल्यापासून पाऊसदेखील ओसरला आहे. अधून मधून पावसाची एखादी मोठी सर कोसळत असून, आता मुंबईकरांना ब-यापैकी सुर्यनारायणाचे दर्शन होते आहे. पावसाने चांगली कामगिरी केल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणारे सात तलाव देखील पुरे पुर भरत आहेत. सात पैकी चार तलाव ओव्हर फ्लो झाले असून, उर्वरित तीन तलावदेखील भरण्याच्या मार्गावर आहेत. सात तलावांतील एकूण जलसाठा ९५ टक्क्यांच्या आसपास पोहचला आहे.
महाराष्ट्राचा विचार करता राज्यात सर्वदूर ब-यापैकी पावसाची नोंंद झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील अधिकच्या पावसाची नोंद झाली असली तरी येथील काही जिल्हयांत अद्यापही आकडेवारीच्या तुलनेत पुरेसा पाऊस अपेक्षित आहे. जुन, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ब-यापैकी कामगिरी केली असून, आता शेवटच्या सप्टेंबर महिन्यात पावसाची कामगिरी कशी असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सप्टेंबर महिन्यात पडणा-या पावसावर कृषीविषयक गणिते अवलंबून असून, मुंबईच्या पाणी कपातीचा निर्णय देखील सप्टेंबरमध्ये पडणा-या पावसावर अवलंबून राहणार आहे.