मुंबईचे रस्ते होणार सुंदर; स्पर्धक संस्थांकडून मिळाल्या नवीन कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:46 AM2019-12-11T02:46:32+5:302019-12-11T06:10:29+5:30
रेडिओ जॉकी मलिष्का यांनी खड्ड्यांवर केलेल्या विडंबन गीतामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली.
मुंबई : जागतिक दर्जाच्या मुंबईतील रस्त्यांना नावीन्यपूर्ण लूक देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी दोन महिन्यांपूर्वी शहर व उपनगरातील पाच प्रमुख रस्त्यांचे डिझाइन करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत सुरक्षित व सुंदर रस्ता तयार करण्याच्या उत्कृष्ट प्रकल्पाचे सादरीकरण करणाऱ्या पाच संस्थांना मंगळवारी विजयी घोषित करण्यात आले. नगररचनाकार व वस्तुविशारदांच्या या पाच पथकांच्या मदतीने मुंबईतील रस्त्यांना भविष्यात नवीन रूप देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
मुंबईतील रस्ते कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खड्ड्यात जात असून त्याचे तीव्र पडसाद शहरातच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभर उमटतात. रेडिओ जॉकी मलिष्का यांनी खड्ड्यांवर केलेल्या विडंबन गीतामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांना खड्डेमुक्त करण्याबरोबर त्यांना नवीन लूक देण्याचाही पालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी आॅक्टोबर महिन्यात ‘मुंबई स्ट्रीट लॅब’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या मदतीने महापालिकेने आयोजित केलेली अशा प्रकारची ही पहिली स्पर्धा आहे. २२ आॅक्टोबरपर्यंत स्पर्धकांना आपले डिझाइन सादर करण्यास सांगण्यात आले होते.
त्यानुसार एस.व्ही. मार्ग, नेपियन्सी रोड, विक्रोळी पार्कसाइट रोड क्रमांक १७, मौलाना शौकत अली रोड आणि राजा राम मोहन रॉय असे शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील पाच रस्त्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या रस्त्यांवर नावीन्यपूर्ण बदल कसे करणार? त्यावरील स्ट्रीट फर्निचर (पथदिवे, बाकडे), दिशादर्शक चिन्ह, वाहतुकीची दिशा, पदपथाची रचना याचा अभ्यास करून स्पर्धकांनी आपले सादरीकरण पालिकेने नियुक्त केलेल्या पंचासमोर केले होते. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या संस्थांच्या माध्यमातून रस्त्यांची सुरक्षित व सुंदर आखणी करण्यावर भर असणार आहे, असे ्रपालिकेच्या अधिकाºयाने सांगितले.
मुंबईचे रस्ते अधिकच सुंदर व सुरक्षित होतील. मात्र, सीएसटी स्थानकाजवळ पादचाऱ्यांसाठी विशेष रस्ता केला होता. त्याची आता दुरवस्था झाली आहे. अशी अवस्था प्रस्तावित रस्त्यांची होऊ नये, एवढीच अपेक्षा.
शहरातील पाच प्रमुख रस्त्यांच्या डिझाइनचे विजयी स्पर्धक
एस.व्ही. मार्ग
प्रसन्न डिझाइन आर्किटेक्ट
नेपियन्सी रोड
स्टुडिओ पोमेग्रेनेट
विक्रोळी पार्कसाइट रोड क्रमांक १७
वांद्रे कॉलेक्टिव्ह रिसर्च अॅण्ड डिझाइन फाउंडेशन
मौलाना शौकत अली रोड
मेड इन मुंबई
राजा राम मोहन रॉय
स्टुडिओ फील अॅण्ड डिझाईन...
मुंबईतील पाच रस्त्यांचे डिझाईन, त्यावरील स्ट्रीट फर्निचर, दिशादर्शक चिन्ह, वाहतूक, पदपथाची रचना यांचा अभ्यास करून नवीन रचना वास्तुविशारद आणि नगररचनाकारांकडून करून घेण्यात आली आहे. विजयी स्पर्धकांना पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
च्संकल्पना व्यावहारिक, त्या परिसरातील स्थानिक वैशिष्ट्ये आणि सुरक्षित रस्त्यांची गरज लक्षात घेऊन डिझाईन दीर्घकाळ टिकून राहील असे असावे, अशी अट या स्पर्धेत घालण्यात आली होती.