मुंबईच्या समुद्रातील पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाची घोषणा हवेतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 02:35 PM2023-06-15T14:35:21+5:302023-06-15T14:35:21+5:30
सर्वसामान्यांची पालिका प्रशासनाकडे विचारणा
रतींद्र नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांव्यतिरिक्त मुंबईची वाढती तहान भागवावी यासाठी पालिकेने इस्त्रायलच्या मदतीने समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या निक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. मात्र, गेली अनेक वर्षे हा प्रकल्प केवळ चर्चेत राहिला असून या निक्षारीकरण प्रकल्पाची एक वीट ही अद्याप रचलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊन केव्हा सुरू होणार, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
मुंबईत सध्या ४ लाख ६० हजार नळजोडण्या असून त्यामार्फत पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिन्यांच्या जाळ्यांची लांबी सुमारे ५००० कि.मी. आहे. मुंबईतील दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी सुमारे १००० झडपांची उघडझाप केली जाते.
मुंबईत तूर्तास तरी पाणी कपातीचा आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाणी गळतीचे प्रमाण पूर्वी अधिक होते, ते आता बऱ्यापैकी कमी झाले आहे. पाणी गळती होत असल्यास नागरिकांकडून तात्काळ पालिकेला कळविले जाते. त्यावर पालिकेचा पाणीपुरवठा विभाग तातडीने कार्यवाही करतो. -चंद्रकांत मेतकर, जलअभियंता
बांधकाम, तरण तलावाचा पाणीपुरवठा बंद
वाढत्या पाण्याच्या गरजेमुळे पालिकेने राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात केली असून पाऊस लांबल्यास पाणी कपात केली जाईल व पाणी कपात केल्यानंतरही पाऊस पडला नाही, तर मुंबईतील बांधकाम, कारखान्यांचा, तरण तलावाचा पाणीपुरवठा थांबवण्याचा पालिका निर्णय घेऊ शकते.
बांधकाम, तरण तलावाचा पाणीपुरवठा बंद
वाढत्या पाण्याच्या गरजेमुळे पालिकेने राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात केली असून पाऊस लांबल्यास पाणी कपात केली जाईल व पाणी कपात केल्यानंतरही पाऊस पडला नाही, तर मुंबईतील बांधकाम, कारखान्यांचा, तरण तलावाचा पाणीपुरवठा थांबवण्याचा पालिका निर्णय घेऊ शकते.
असा होतो पाण्याचा अपव्यय
मुंबईत पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी यंत्रणा ब्रिटिशकालीन आहे. ती जीर्ण झाली असून अनेकदा या जलवाहिन्यांना तडे जातात किंवा त्या फुटतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. काही ठिकाणी जलवाहिन्यांमधून पाणी चोरीचे प्रकारही घडतात. यामुळे शुद्धीकरण केलेले पाणीही दूषित होते. पाण्याचा अपव्यय होतो. इतकेच नव्हे तर विविध प्राधिकरणाची विकासकामे सुरू असताना किंवा बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीमुळे जलवाहिनी फुटते व त्याचा परिणाम पाणी गळतीवर होतो.
गळती झालेल्या पाण्याची नोंद नाही
उन्हामुळे पाण्याची मागणी सध्या वाढू लागली आहे. साधारणतः मार्चनंतर पाण्याची गरज वाढते. एप्रिल, मे महिन्यातील उकाड्यामुळे मुंबईकरांकडून पाण्याचा वापर अधिकच वाढतो. त्यातच पाण्याला लागलेल्या गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले. तर गळती दुरुस्तीच्या कामानंतर मुंबईकरांच्या नळांमधून गढूळ पाणी येऊ लागले. या गळती झालेल्या पाण्याची कोणतीही नोंद नाही.
जलस्त्राेताचा दुसरा पर्याय नाही!
- मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अजूनही पावसावरच अवलंबून राहावे लागते. एखाद्या वर्षी सात तलावांत पाऊस कमी प्रमाणात पडला तर मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. सध्या तरी सात धरणांव्यतिरिक्त पालिकेकडे जलस्त्राेताचा दुसरा पर्याय नाही.
- पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली असून समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाला अद्याप सुरुवात झालेली नाही. तर वाडा तालुक्यात गारगाई धरण बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता मात्र अद्याप तो पुढे सरकलेला नाही.