Join us  

मुंबईची हवा झाली ‘सायलंट किलर’

By admin | Published: February 05, 2016 3:05 AM

देवनार डम्पिंग ग्राउंडवर लागलेल्या आगीने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. वातावरणातील धुराने शहराच्या प्रदूषणात भर पडली. महत्त्वाचे म्हणजे वातावरणात डम्पिंगच्या आगीच्या

सचिन लुंगसे/पूजा दामले,  मुंबईदेवनार डम्पिंग ग्राउंडवर लागलेल्या आगीने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. वातावरणातील धुराने शहराच्या प्रदूषणात भर पडली. महत्त्वाचे म्हणजे वातावरणात डम्पिंगच्या आगीच्या धुरासह वाहनांचा धूर आणि धुलीकणांचीही भर पडल्याने प्रदूषित हवा मुंबईकरांचा गळा घोटू लागली आहे. मागील आठवड्याभरापासून शहरासह उपनगरावर जमा झालेला धूर अजूनही कायम आहे. त्यामुळे वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईची प्रदूषित हवा आता ‘सायलंट किलर’ ठरू लागली आहे. विशेषत: दिल्लीच्या तुलनेत मुंबई अधिकाधिक प्रदूषित असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. परिणामी हा हवापालट मुंबईकरांच्या चांगलाच अंगाशी आला आहे.मागील आठवड्यात देवनार डम्पिंग ग्राउंडला आग लागली. त्यातून निघणारा धूर मुंबईकरांचा जीव घेऊ लागला. महत्त्वाचे म्हणजे अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आणि मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरातील ठिकाणांवर धुराने कब्जा केला. विशेषत: पूर्व उपनगरातील कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, देवनार, गोवंडी, भांडुप आणि मुलुंड परिसरातील रहिवाशांना धुराचा अतोनात त्रास झाला. हा केवळ डम्पिंगचा धूर नाही तर वाहनांच्या धुरानेही यात भर घातली. शिवाय पूर्व उपनगरातील चेंबूरमधील खतांच्या कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणानेही वातावरण आणखी बिघडले.डम्पिंगवर लागलेली आग विझवण्यासाठी महापालिकेच्या एम/पूर्व विभागाने मुंबई अग्निशमन दलास ‘मॅग्नेशियम क्लोराइड’ उपलब्ध करून दिले आहे. प्रत्यक्षात मात्र डम्पिंगचा अजब डोंगर आणि त्यावर लागणाऱ्या आगीने अग्निशमन दलासह महापालिका प्रशासनाच्याही नाकी नऊ आले आहेत.महत्त्वाचे म्हणजे पुन्हा आग लागली तर अग्निशमन दलासाठी ‘राष्ट्रीय केमिकल व फर्टिलायझर’ येथूनही पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु लागलेली आग विझवण्यात दलाला यश आले तरी वातावरणात पसरलेल्या धुराची समस्या कायम आहे. परिणामी हवेतला हाच धूर आता ‘सायलंट किलर’ ठरत आहे.मुंबईत दररोज सुमारे ३०० हून अधिक नव्या मोटारींची भर होत आहे. त्या मोटारींच्या प्रदूषणामुळेही वातावरण खराब झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे एकूण वाहतुकीतील केवळ सुमारे ५ टक्के वाटा उचलणारी मोटार मुंबईला प्रदूषणामुळे वेठीस धरत आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे दमा आणि ब्रॉन्कायटिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. प्रदूषणामुळे मुंबईकरांना विविध आजार जडण्याचा धोका आणखी बळवला आहे. घसा खवखवण्याचे प्रमाण तर भलतेच वाढले आहे. निम्मे मुंबईकर ‘थ्रोट इन्फेक्शन’ने बेजार झाले आहेत. शिवाय वातावरणात पसरलेल्या धुलीकणांमुळे वाहनचालकांनाही वाहने चालवण्यास अडथळा येत आहे.सद्य:स्थितीमध्ये देवनारच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तरी त्यातून निघणारा धूर अद्यापही वातावरणात मिसळतो आहे. त्याचे प्रमाण कमी असले तरी यापूर्वी वातावरणात पसरलेला धूर अद्यापही कायम असल्याने मुंबईकरांना आणखी काही दिवस वाढलेल्या प्रदूषणाला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.गत आठवड्यातील गुरुवारी देवनारवर लागलेली आग रविवारी विझते, तोवर बुधवारी पुन्हा एकदा या आगीचा भडका उडाला. त्यामुळे मुंबई महापालिकेसह अग्निशमन दलाचे धाबे दणाणले. ही आग विझवण्यासाठी विक्रोळीवरून अग्निशमन दलाची जादा कुमक मागवण्यात आली. मात्र देवनार येथे पोहोचेपर्यंत पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झाले. बुधवारी पेटलेल्या देवनारच्या आगीची छाया महापालिकेच्या मुख्यालयात सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही दिसून आली. विरोधकांनी थेट तोंडाला मास्क लावून स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.प्रदूषणाचा धोका लहान मुलांना अधिकमुंबईकरांना वाहतूककोंडी नवीन नाही. वाहतूककोंडी म्हटले की, आठवतो तो हॉर्नचा कर्कश आवाज. पण सध्या गाड्यांचा धूर आणि प्रदूषण त्यापेक्षाही घातक ठरत आहे. प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास नकळतपणे घुसमटत आहे. आता परिणाम दिसत नसले तरीही पुढच्या काळात याचे गंभीर परिणाम श्वसन आणि शरीरावर दिसून येतात. प्रदूषित हवेमुळे दमा अधिकदमा असणाऱ्यांना प्रदूषणाचा अधिक त्रास होतो. प्रदूषित हवेमुळे दमा अधिक वाढतो, श्वास लागतो. सतत दम्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना इन्हेलर वापरावा लागतो. अधिक इन्हेलरच्या वापरामुळे त्याचेही शरीरावर दुष्परिणाम होतात. ज्यांना दम्याचा त्रास नाही, त्यांना दम्याचा त्रास होऊ शकतो. स्मॉग म्हणजे काय?स्मॉग म्हणजे स्मोक आणि फॉगचे मिश्रण. पहिल्यांदा स्मॉग लंडनमध्ये आढळून आले होते. औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून हवेत स्मॉग तयार होते. यात कारखान्यांचा धूर, वायूंमुळे हवा अधिक प्रमाणात दूषित होते. हिवाळ्यात धुके असते. त्यामुळे या काळात हवा अधिक दूषित होते. लहान मुले, ज्येष्ठांना अधिक त्रासलहान मुलांना प्रदूषणाचा त्रास अधिक होतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसते. त्याचबरोबर त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यामुळे प्रदूषित हवा त्यांच्या शरीरात गेल्यावर त्यांना अधिक त्रास होतो. सध्या थंडी असल्यामुळे सकाळी धुलीकण हे जमिनीलगतच राहतात. त्यामुळे अधिक त्रास होतो. लहान मुलांची सकाळी शाळा असते. अनेक मुले स्कूलबस, बस, रिक्षा, टॅक्सी, दुचाकीने प्रवास करतात. ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती देखील कमी झालेली असते. त्यामुळे त्यांनाही प्रदूषणाचा त्रास होतो. प्रदूषित हवेमुळे अ‍ॅलर्जी, सतत संसर्ग होतो.- डॉ. महेश जन्सारी, श्वसनविकारतज्ज्ञ