Join us

चांद्रयान मोहिमेला मुंबईचे बळ; गोदरेज एरोस्पेसमध्ये खास तयारी, १४ जुलैला लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 6:23 AM

चांद्रयान- ३ या मोहिमेचे बजेट ६५१ कोटी आहे. चांद्रयान-३ चे लँडर चंद्रावर लँडिंग होण्यास यशस्वी झाले, तर अशी मोहीम करणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे

मुंबई - मुंबईतल्या एका खासगी एरोस्पेस कंपनीने आगामी चांद्रयान- ३ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) महत्त्वपूर्ण घटकांचा पुरवठा केला आहे. लिक्विड प्रोपल्शन इंजिन जसे की, विकास, सी ई २० आणि चंद्र मोहिमेसाठी उपग्रह अस्टर्स गोदरेज एरोस्पेसने विक्रोळी येथे तयार केले आहेत.

गोदरेज एरोस्पेसचे सहायक उपाध्यक्ष मानेक बेहरामकामदिन यांनी याबाबत सांगितले की, आमची कंपनी तीन दशकांहून अधिक काळ अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेल्या इस्रो या संस्थेशी संलग्न आहे. इस्रोच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटकांच्या निर्मितीसह सहकार्याची सुरुवात झाली. नंतर लिक्विड प्रोपल्शन इंजिनपर्यंत विस्तारित झाला. गोदरेज एरोस्पेसचे चांद्रयान १ आणि २ व मंगळयान अंतराळ मोहिमांमध्ये योगदान होते, शिवाय इस्रोच्या इतर मोहिमांमध्ये भाग घेण्यात आला होता.

  1. चांद्रयान- ३ हे १४ जुलैला लॉन्च होणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या यानाचे लॉन्चिंग केले जाणार आहे. १४ जुलैला दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे.
  2. चांद्रयान- ३ या मोहिमेचे बजेट ६५१ कोटी आहे. चांद्रयान-३ चे लँडर चंद्रावर लँडिंग होण्यास यशस्वी झाले, तर अशी मोहीम करणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे. या आधी अमेरिका, रशिया, चीन या देशांनी चंद्रावर स्पेसक्राफ्ट उतरविले.
  3. इस्त्रोच्या चांद्रयान २ चे - चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर अंतिम क्षणाला संपर्क तुटला होता. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांसह नागरिकांचा मोठा हिरमोड झाला होता.
  4. गोदरेज एरोस्पेस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे नवीन सुविधा उभारण्यासाठी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.
टॅग्स :चांद्रयान-3इस्रो