मुंबईचे तापमान पुन्हा १८ अंशावर
By admin | Published: February 23, 2017 07:11 AM2017-02-23T07:11:10+5:302017-02-23T07:11:10+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीची रंगत वाढत असतानाच, मुंबई शहराच्या कमाल तापमानाने ३८ अंशाचा पारा गाठला होता.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची रंगत वाढत असतानाच, मुंबई शहराच्या कमाल तापमानाने ३८ अंशाचा पारा गाठला होता. परिणामी, ऐन मतदानादिवशी मुंबईकरांनी उन्हाचे चटके खात मतदान केले. महत्त्वाचे म्हणजे, तापदायक ऊन असतानाही मुंबईकरांनी उत्साहात मतदान केल्याने मतदानाचा पारा चढल्याचे चित्र होते. मात्र, मतदानाचा दिवस उलटताच बुधवारी तापमानात पुन्हा घसरण झाली आहे. मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, १८ अंशाच्या आसपास नोंदवण्यात आला असून, त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.
मागील आठवड्याभरापासून मुंबईच्या कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली होती. कमाल तापमान थेट ३८ अंशावर पोहोचले होते. ३४ ते ३८ अंशादरम्यान नोंदवण्यात येत असलेल्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना चांगले चटके बसत होते. विशेषत: प्रखर सूर्यकिरणे तापदायक वातावरणात भर घालत असल्याने, मुंबईकरांना उन्हाने बेजार केले होते. मात्र, आता पुन्हा कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. गुरुवारसह शुक्रवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, १९ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाने हैराण झालेल्या मुंबईकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)